मुंबई : युक्रेनच्या संकटामुळे आजही देशातील बाजारात सोन्याच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे फ्युचर्स भाव 1.8% वाढून 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोने त्याच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक दराच्या तुलनेत फक्त 2700 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला होता. त्यानंतर पुन्हा सोन्याचे भाव इतके वाढलेले नाहीत. आता मात्र, बदलत्या जागतिक परिस्थितीत सोने पुन्हा एकदा 56 हजारांचा टप्पा पार करील असा अंदाज व्यक्त होत आहे.
आता जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1.5% ने वाढून $1,998.37 प्रति औंस झाली आहे. दुसरीकडे, मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये चांदीची फ्युचर्स किंमत 1.5% वाढून 70173 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. स्पॉट सिल्व्हर 1.7% वाढून $26.09 प्रति औंस आहे, तर प्लॅटिनम 2.3% वाढून $1,147.19 वर गेला आहे.
रशिया-युक्रेन संकटाने इक्विटी मार्केटला मोठा फटका बसला आहे आणि तेलाच्या किमती 14 वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहेत. युक्रेनमधील युद्ध थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कठोर पाश्चात्य निर्बंध आणि व्यापक आंतरराष्ट्रीय निषेध असूनही युक्रेन शरण येईपर्यंत हमले सुरुच ठेवणार असल्याचे ठरवल्याचे दिसत आहे.
कोटक सिक्युरिटीजने एका नोटमध्ये म्हटले आहे की, “रशिया-युक्रेनमधील तणाव धोकादायक मालमत्तेपासून सुरक्षित गुंतवणुकीकडे वळला आहे आणि याचा फायदा सोने, रोखे, अमेरिकन डॉलर इत्यादींमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, वस्तू पुरवठाही संकटात सापडला आहे. कारण, रशिया हा प्रमुख उत्पादक देश आहे. तर, अमेरिका आणि इतर देशांनी आतापर्यंत थेट रशियन निर्यातीला लक्ष्य केलेले नाही. बँकिंग आणि शिपिंगवरील निर्बंधांमुळे व्यापार कठीण होत आहे.