दिल्ली : कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. आज कच्च्या तेलाची किंमत तब्बल $130 वर पोहोचली आहे, जी 14 वर्षातील सर्वाधिक पातळी आहे. कच्च्या तेलाच्या या वाढीची दोन मुख्य कारणे आहेत. इराणकडून कच्च्या तेलाचा पुरवठा होण्यास उशीर होण्याची भीती बाजारात वाढली आहे. दुसरीकडे अमेरिका, युरोप आणि मित्र राष्ट्रांनी रशियाकडून (Russia-Ukraine Crisis) तेल न घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी राहिला आणि कच्च्या तेलाने 2008 नंतरची सर्वाधिक पातळी गाठली. रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर निर्बंध लादण्याबाबत अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांमध्ये चर्चा सुरू असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले.
तेल आणि वायूच्या आयातीबद्दल विचारले असता, ब्लिंकेन यांनी रविवारी सांगितले, की अध्यक्ष जो बायडेन यांनी एक दिवस आधी या मुद्द्यावर राष्ट्रीय सुरक्षा परिषद बैठक घेतली होती. बायडेन आणि पश्चिमेने रशियाच्या ऊर्जा उद्योगावर अद्याप निर्बंध लादलेले नाहीत जेणेकरून त्याचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. ब्लिंकेन म्हणाले, की “आम्ही आमच्या युरोपियन भागीदार आणि मित्र राष्ट्रांशी रशियाकडून तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याच्या शक्यतेवर चर्चा करत आहोत, तसेच जगभरातील बाजारपेठांमध्ये तेलाचा पुरेसा पुरवठा आहे याची खात्री करून घेत आहोत.
इराणने 2015 मध्ये आण्विक कार्यक्रमाबाबत करार केला होता. यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या 5 सदस्यांव्यतिरिक्त (अमेरिका, रशिया, ब्रिटेन, चीन आणि फ्रान्स) जर्मनीचा सहभाग होता. या करारानुसार त्याच्यावरील अनेक निर्बंध हटवण्यात आले. 2018 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणवर बंदी टाकली, त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिघडली.
जो बायडेन प्रशासन पुन्हा एकदा इराणवरील बंदी उठवण्याचा विचार करत आहे. इराणने स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत सर्व सहा देश निर्बंध उठवण्यास तयार होत नाहीत तोपर्यंत ते चर्चेसाठी सहमत नाहीत. आता रशियाने एक नवीन मागणी ठेवली आहे. युक्रेनच्या संकटाचा इराणबरोबरच्या व्यापारी संबंधांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होऊ नये, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे ही चर्चा पूर्ण होऊ न शकल्याने इराणकडून होणारा संभाव्य तेल पुरवठा पुन्हा संकटात सापडला आहे.
या अनिश्चिततेच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोने आज $2000 च्या वर गेले आहे, जी 19 महिन्यांची सर्वाधिक पातळी आहे. ऑगस्ट 2020 नंतरचा हा सर्वात जास्त भाव आहे. त्याचवेळी चांदीचे दरही वाढले आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोने-चांदीचे दर आणखी वेगाने वाढतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?