ऐन उन्हाळ्यात फ्रिज, पंखे देणार झटका..! ‘त्यामुळे’ कंपन्या ‘हा’ निर्णय घेण्याच्या विचारात; जाणून घ्या..
मुंबई : उन्हाळ्यात एसी, रेफ्रिजरेटर आणि पंखा घेण्याचा विचार करत असाल तर लवकर खरेदी करा. कारण, वाढत्या खर्चामुळे कंपन्या येत्या काही दिवसांत त्यांच्या किमती वाढ करण्याचा विचार करत आहेत. खरे तर रशिया-युक्रेन युद्धामुळे तांबे, अॅल्युमिनिअमच्या किमती जागतिक बाजारपेठेत विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्याचा भार एसी, फ्रीज आणि पंखे बनवणाऱ्या कंपन्यांवरही पडत असून, वाढीव किंमत वसूल करण्यासाठी येत्या काही दिवसांत किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात. गेल्या दोन वर्षांत कंपन्यांनी तीनदा दरवाढ केली आहे.
जागतिक बाजारपेठेत अॅल्युमिनियम आणि तांब्याच्या किमती गेल्या वर्षभरात दीड पटीने वाढल्या आहेत. गेल्या वर्षात फेब्रुवारीमध्ये अॅल्युमिनियमची किंमत 1.61 लाख रुपये प्रति टन होती, ती आता 2.80 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे तांब्याचे भावही प्रति टन 5.93 लाख रुपयांवरून 7.72 लाख रुपये प्रति टन झाले.
इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचे म्हणणे आहे, की आतापर्यंत ते त्यांचे मार्जिन कमी करून काम करत होते. परंतु वाढत्या किमतीमुळे आता ते शक्य नाही. गेल्या दोन वर्षांत उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता दिसून येते. उत्पादन खर्च आणि बाजारभाव यामध्ये 10 टक्के तफावत आहे, ती भरून काढण्यासाठी किंमत वाढ करणे आवश्यक झाले आहे.
कंपन्यांना अजूनही कोरोनाच्या लाटेची भीती आहे ज्यामुळे ते आवश्यक त्या प्रमाणात उत्पादन करू शकत नाहीत. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेंट आणि प्लॅस्टिकचे भावही वाढत आहेत. त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनावरही दिसून येत आहे. इंधनाच्या महागाईमुळे मालवाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे एकूणच कंपन्यांवर उत्पादन खर्च वाढल्यास त्याचा ताण लोकांवर देखील पडणार आहे. त्यादृष्टीने आता कंपन्यांनी विचार सुरू केला आहे.
महागाईवर आता लोकांनीच शोधलाय ‘हा’ उपाय; कंपन्यांनाही बसलाय फटका; जाणून घ्या, डिटेल..