मुंबई : रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धाचा आज नववा दिवस आहे. या युद्धात अजूनही कोणत्याही देशाने माघार घेतलेली नाही. युद्धातील विध्वंस सुरूच आहे. मात्र, या भयानक युद्धाचे चटके अवघ्या जगालाच बसत आहेत. तसेही युद्धाचे परिणाम कधीही चांगले होत नाही. नुकसानच होते. त्यात आताच्या आधुनिक काळात तर प्रत्येक देश दुसऱ्या देशावर काही प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे या युद्धाचे दुष्परिणाम त्या देशांनाही सहन करावे लागत आहेत. तर दुसरीकडे जागतिक बाजारातही या युद्धाचे पडसाद उमटत आहेत. या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पडला आहे.
देशात सोन्याचे भाव 14 महिन्यांत सर्वाधिक पातळीवर पोहोचले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात 241 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे आता सोन्याचे भाव 52,011 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. आज चांदीचे दर 316 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सध्या चांदीचा भाव 68 हजार 220 रुपये प्रति किलो असे आहेत. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने सोन्या-चांदीचे दर भरमसाठ वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात पडले आहेत. काल गुरुवारी सुद्धा सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढले होते. चांदीचे भाव देखील वाढले होते.
दरम्यान, रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ आणि भू-राजकीय तणाव या कारणांमुळे देशांतर्गत सोने मार्केटमध्ये सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे कल वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने या वर्षाच्या अखेरीस 58000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास किंमती 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.