दिल्ली : रशिया युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आता या युद्धाने महागाईचा भडकाच उडाला आहे. जगभरात महागाई अतिशय वेगाने वाढत आहे. युरोपमधील महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये विक्रमी 5.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग चौथ्या महिन्यात महागाई विक्रमी पातळीवर राहिली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था वाईट टप्प्यात आहे.
युरोपियन युनियनची सांख्यिकी एजन्सी युरोस्टॅटने बुधवारी सांगितले की, येथील 19 देशांमधील महागाई दर फेब्रुवारीमध्ये वार्षिक 5.8 टक्क्यांनी वाढला आहेत. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे युरोपमधील मध्यवर्ती बँकेवरही दबाव वाढत चालला आहे.
सन 1997 नंतरचा महागाई प्रथमच इतकी वाढली आहे. याआधी, गेल्या महिन्यात महागाई दर (Inflation Rate) 5.1 टक्क्यांवर पोहोचला होता. इतर प्रमुख अर्थव्यवस्थांप्रमाणेच, ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे युरोपमध्ये महागाई वाढत आहे आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यामुळे ही समस्या आणखी वाढली आहे. काही दिवसांआधी, जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांचा महागाईचा दर अनेक दशकांतील सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील महागाई 39 वर्षांत सर्वाधिक पातळीवर आहे. आता युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जर्मनीचा महागाई दर 29 वर्षांत सर्वाधिक वाढला आहे.
त्याच वेळी, IMF च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये, जगभरातील 20 देशांमध्ये महागाईचा दर 10 टक्क्यांच्या वर पोहोचला होता. याआधी 2020 मध्ये, दोन अंकी महागाई दर असलेल्या देशांची संख्या 18 होती. कोरोना संकटाआधी म्हणजेच 2019 मध्ये केवळ 13 देशांमध्ये महागाईचा दर 10 टक्क्यांहून अधिक होता.
दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धामुळे जगभरातील महागाईत मोठी वाढ झाली आहे. रशियाने पुकारलेल्या या युद्धाचा फटका आता अवघ्या जगालाच बसत आहे. सर्वसामान्य नागरिक या संकटात विनाकारण भरडले जात आहेत. युद्ध अजूनही सुरुच आहे. त्यामुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळ संकटांचाच राहणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
महागाई काय अन् कोरोना काय..! तरीही सरकारची चांदीच; पहा, फेब्रुवारी महिन्यात किती मिळालाय जीएसटी..?