खाद्यतेलांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारचा आणखी एक प्लान; पहा, ‘कसा’ वाढणार पाम तेलाचा पुरवठा..?
दिल्ली : युक्रेनच्या संकटामुळे भारतात खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने यासाठी एक योजनाही तयार केली आहे. वास्तविक, केंद्र सरकारने इंडोनेशियाला देशातील पाम तेलाची शिपमेंटमध्ये वाढ करण्यास सांगितले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सरकारी सूत्रांनी सांगितले की, या आठवड्यात केंद्र सरकारचे अधिकारी आणि इंडोनेशियन अधिकाऱ्यांत एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी पाम तेलाच्या निर्यातीत वाढ करण्यास इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
वृत्तसंस्थेनुसार, सरकारला शिपमेंट वाढ करुन तेल पुरवठ्यात झालेल्या नुकसानाची भरपाई करायची आहे. मात्र, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने यावर भाष्य करण्यास नकार दिला. इंडोनेशियाच्या व्यापार मंत्रालयाच्या अधिकार्यांनी देखील अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. युक्रेन आणि रशियामधील युद्धामुळे हे संकट उद्भवले आहे. खरे तर, गेल्या वर्षात देशाच्या खाद्यतेलाच्या आयातीमध्ये युक्रेन आणि रशियाचा वाटा सुमारे 13 टक्के होता. यावर्षात भारताला 16 लाख टन तेलाचा पुरवठा करण्यात आला.
भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेलाचा खरेदीदार देश आहे. अर्ध्यापेक्षा जास्त पामतेल इंडोनेशियाकडून खरेदी केले जाते. तथापि, जानेवारीमध्ये, इंडोनेशिया सरकारने देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली. तेव्हापासून सरकारचे टेन्शन वाढले होते. आता युक्रेन आणि रशियामधील युद्धामुळे सरकारचा ताण वाढला आहे. गेल्या आठ महिन्यांत केंद्र सरकारने वेगवेगळ्या प्रकारे वनस्पती तेलाच्या आयातीवरील करात चार वेळा कपात केली आहे. इतकेच नाही तर केवळ कच्च्या तेलाऐवजी रिफाइंड पाम तेलाच्या विदेशी खरेदीला परवानगी देण्यात आली आहे, तरीही किमती मात्र अजूनही वाढत चालल्या आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने इंडोनेशियाकडे पामतेल निर्यातीत वाढ करण्याची मागणी केली असली तरी यामध्ये कितपत यश मिळेल, याबाबत अद्याप काहीच सांगता येत नाही. कारण, इंडोनेशियाने आधीच निर्यातीवर बंदी टाकली आहे. कारण, त्यांना त्यांच्या देशातील खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात आणायच्या आहेत. अशा परिस्थितीत तेथील सरकार आता धोरणात बदल करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
युद्धामुळे बिघडलेय खाद्यतेलांचे गणित..! पाम तेलामुळे वाढणार सर्व तेलांचे भाव; वाचा महत्वाची माहिती..