मुंबई : सोन्याचा भाव आज आंतरराष्ट्रीय बाजारात 2020 नंतरच्या सर्वाधिक पातळीवर आहे. याचे प्रमुख कारण रशिया-युक्रेनचे युद्ध म्हणता येईल. यामुळे भीतीचे वातावरण पसरले असले तरी लोकांचा सोन्यात गुंतवणुकीचा विश्वास वाढला आहे. तर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. मात्र डॉलर मजबूत होऊनही सोन्याचा दर जवळपास दोन वर्षांत सर्वाधिक वाढला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अलीकडच्या आठवड्यात सोन्याचे भाव वाढले आहेत. याचे कारण म्हणजे रशिया आणि पाश्चिमात्य देशात वाढलेला तणाव. संघर्ष वाढल्यास येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव प्रति औंस $2,000 पर्यंत पोहोचतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या, स्पॉट गोल्ड 3.4 टक्क्यांनी वाढून $1,974.34 प्रति औंस झाले आहे, जो सप्टेंबर 2020 नंतरच्या सर्वाधिक पातळीवर आहे.
IBJA वर दिलेल्या माहितीनुसार, 10 दिवसांत सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 1100 रुपयांनी वाढले आहे. 14 फेब्रुवारीला सोन्याचा दर 49 हजार 739 रुपये होता, जो 25 फेब्रुवारीला 50 हजार 868 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. 24 फेब्रुवारीला जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तेव्हा सोन्याचा भाव 51 हजार 419 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. IBJA डेटानुसार, 17 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान चांदीच्या किमतीत सुमारे 2000 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. या दरम्यान 18 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी रोजी अधिक वाढ नोंदवण्यात आली. 24 फेब्रुवारीला रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या घोषणेनंतर चांदीच्या दरात वाढ होत आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि भू-राजकीय तणाव या कारणांमुळे देशांतर्गत सोने मार्केटमध्ये सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे कल वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने या वर्षाच्या अखेरीस 58000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास किंमती 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.
रशिया-युक्रेन युद्धाचा सोने दरावर मोठा परिणाम, गुंतवणुकदारांकडून मागणी वाढली..