मुंबई : देशातील दुचाकी कंपन्यांच्या डोकेदुखीत वाढ करणारी बातमी मिळाली आहे. कोरोनाच्या संकटातून वाहन उद्योग पूर्वपदावर येत असतानाच सेमी कंडक्टरच्या टंचाईने नवे संकट उभे केले आहे. त्यानंतर आता पुन्हा टेन्शन देणारा अहवाल मिळाला आहे. क्रिसिल (Crisil) या नामांकित संस्थेने सांगितले की, दुचाकींच्या विक्रीत सलग तिसऱ्या आर्थिक वर्षातही घट होऊ शकते. ग्रामीण भागातील दुचाकींच्या मागणीत घट, सणासुदीच्या काळात विक्रीत घट, वाढत्या किमती आणि लोकांनी टाळलेली खरेदी यांसारख्या कारणांमुळे चालू आर्थिक वर्षात दुचाकींच्या विक्रीत 8-10 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.
क्रिसिल लिमिटेड ही एक जागतिक विश्लेषणात्मक कंपनी आहे, जी संशोधन आणि जोखीम आणि धोरण मार्गदर्शन सेवा प्रदान करते. ही कंपनी देशातील आघाडीची एजन्सी आहे. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात विक्रीतील घट सलग दोन वर्षांच्या घसरणीनंतर आधीच कमी आधारावर अपेक्षित आहे. जी सन 2021 मध्ये 13 टक्के आणि 2020 मध्ये 18 टक्के होती. एका दशकाहून अधिक काळातील ही पहिलीच वेळ आहे की सलग तीन आर्थिक वर्षांपासून दुचाकी विक्रीत घट होत आहे.
मोटरसायकलचे प्रमाण जे एकूण दुचाकींच्या संख्येपैकी दोन-तृतीयांश आहे, या आर्थिक वर्षात सुमारे 8-9 टक्क्यांनी घट होईल. एजन्सीचे वरिष्ठ संचालक अनुज सेठी म्हणाले की, कोरोनाच्या लाटा आणि अन्य कारणांमुळे या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात दुचाकींच्या मागणीला फटका बसला आहे. तसेच वाहन आणि इंधनाच्या किमतींचा देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे दुचाकीच्या विक्रीत घट होत आहे. आगामी काळातही दुचाकींची विक्री घटण्याचीच जास्त शक्यता आहे.
दरम्यान, देशातील दूरसंचार कंपन्यांनंतर आता वाहन क्षेत्रातील कंपन्याही कॅशबॅक ऑफर देत आहेत. देश-विदेशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी यामाहाने देशातील काही राज्यांत कॅशबॅक योजना सुरू केली आहे. Yamaha Motor India ने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि देशाच्या उत्तर-पूर्व भागांमध्ये हायब्रीड स्कूटरवर कॅशबॅक ऑफर जाहीर केल्या आहेत. Yamaha ही कॅशबॅक ऑफर Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid स्कूटरवर फेब्रुवारी महिन्यापर्यंत देत आहे.
आसाम, पूर्वोत्तर आणि पश्चिम बंगालमध्ये, Fascino 125 Fi Hybrid या स्कूटर खरेदीवर 2500 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर करत आहे. महाराष्ट्रात Fascino 125 Fi Hybrid आणि Ray ZR 125 Fi Hybrid वर 2500 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. तामिळनाडूमध्ये Fascino 125 Fi Hybrid आणि Ray ZR 125 Fi Hybrid वर 5000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे.
स्वदेशी कंपनीच्या दुचाकींची विदेशात क्रेझ..! पहा, कोणत्या कंपनीने केलेय ‘हे’ जबरदस्त रेकॉर्ड