दिल्ली : देशात आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्समध्येही वेगाने वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यांत देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची संख्या अडीच पटीने वाढली आहे. ऊर्जा मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात सांगितले की, गेल्या चार महिन्यांत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह नऊ प्रमुख शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशनची (Electric Vehicle Charging Station) संख्या वेगाने वाढली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी धोरणाचा भाग म्हणून मोठ्या शहरांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या विधानानुसार, ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान या नऊ शहरांमध्ये 678 अतिरिक्त चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, या शहरांमध्ये उपस्थित असलेल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनची संख्या 940 झाली आहे. त्यांची संख्या आता देशभरात सुमारे 1,640 झाली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात, सरकारने 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या क्रमाने, इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये चार्जिंग स्टेशनची संख्या वाढ केली जात आहे. 14 जानेवारी रोजी ऊर्जा मंत्रालयाने चार्जिंग स्टेशनच्या उभारणी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे आणि सुधारित मानके जारी केली होती.
चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या प्रयत्नात सरकारने ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE), एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड (EESL), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एनटीपीसी तसेच खाजगी कंपन्यांसारख्या सार्वजनिक संस्थांना मदत केली आहे. यामुळे मोठ्या क्षेत्रात पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत होईल आणि इलेक्ट्रिक वाहनांना आधिक प्रोत्साहन मिळेल.
आता इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगचे टेन्शन विसरा; ‘ही’ कंपनी सुरू करणार इतके चार्जिंग स्टेशन