एक वर्षांनंतर सोन्याने पार केलाय ‘तो’ टप्पा; ‘या’ दोन कारणांमुळे वाढताहेत सोन्याचे भाव; जाणून घ्या..
मुंबई : जगभरातील वाढती महागाई आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात वेगाने वाढ होत आहे. सोन्याचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे दर नेहमीच कमी जास्त होत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत, रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणावही यासाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने 50 हजार 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच, सोन्याने पुन्हा एकदा 50 हजारांचा टप्पा पार केला आहे.
एक्सचेंजनुसार, सोन्याचा वायदे भाव जानेवारी 2021 नंतर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय कमॉडिटी एक्सचेंजमध्येही सोने 1,900 डॉलर प्रति औंस किमतीवर पोहोचले. मागील वर्षात जून 2021 मध्ये हा दर होता. 2022 मध्ये आतापर्यंत सोने 3.6 टक्के वाढले आहे. ही वाढ 2020 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. त्यावेळी कोरोना काळात सोने रेकॉर्ड 2,100 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले होते.
सोन्याच्या भाववाढीमागे काही महत्वाची कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे महागाई. जगभरात महागाई वाढली आहे. अमेरिका, ब्रिटेनसारख्या श्रीमंत देशांनाही महागाईचे चटके बसत आहेत. दुसरीकडे भारतातही किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर अमेरिकेत किरकोळ महागाईचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक पातळीवर आहे. त्यानंतर रशिया-युक्रेन तणावाचा परिणाम दिसून येत आहे. सध्या अशी परिस्थिती आहे, की रशिया कधीही युक्रेनवर आक्रमण करू शकतो. अमेरिकेने तसा इशाराही दिला आहे. हे संकट पाहता जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढत आहेत.
केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले, की महागाईचा धोका जसा वाढत जाईल तसा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम होईल. महागाईचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतो. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आजही सोन्याला बसलाय झटका..! पहा, किती रुपयांनी घटलेत भाव; सोने खरेदीआधी चेक करा नवीन दर