कोरोनाने ‘त्या’ व्यापाऱ्यांनाही सोडले नाही.. पहा, नव्या वर्षात ‘कसा’ बसलाय जोरदार झटका..
मुंबई : किरकोळ महागाईत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना झटका बसला आहे तर दुसरीकडे देशातील व्यापारी वर्गही हैराण झाला आहे. महागाईनंतर आता किरकोळ विक्रीत घट झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये निर्बंध आल्याने जानेवारी 2022 मध्ये देशातील किरकोळ विक्रीवर परिणाम झाला आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या नवीन व्यवसाय सर्वेक्षणात म्हटले आहे, की जानेवारी 2020 मध्ये किरकोळ विक्री जानेवारी 2019 च्या कोरोनापूर्व विक्री पातळीच्या तुलनेत 91 टक्क्यांवर पोहोचली आहे.
प्रदेशनिहाय आकडेवारीनुसार, पूर्वेकडील भागात जानेवारी 2019 च्या तुलनेत गेल्या महिन्यात किरकोळ विक्रीत सर्वाधिक 13 टक्क्यांची घट झाली. त्यापाठोपाठ पश्चिम भागात 11 टक्के आणि उत्तरेत आठ टक्क्यांची घसरण झाली. RAI ने सांगितले की, दक्षिणेला सर्वात कमी फटका बसला आहे. जानेवारी 2022 मध्ये या क्षेत्राच्या किरकोळ विक्रीत दोन टक्क्यांनी घट झाली.
सौंदर्य, निरोगीपणा आणि वैयक्तिक काळजी या क्षेत्रातील किरकोळ विक्रीला सर्वाधिक फटका बसल्याचे आरएआयने म्हटले आहे. यामध्ये गेल्या महिन्याच्या जानेवारी 2019 च्या तुलनेत 24 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ फर्निचर आणि फर्निशिंगमध्ये 12 टक्के, तर पोशाख आणि कपड्यांमध्ये सात टक्क्यांची घट झाली. सर्वेक्षणानुसार, ज्वेलरी विभागातील किरकोळ विक्री 2019 मधील याच महिन्याच्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये 11 टक्क्यांनी वाढली आहे. जलद सेवा देणाऱ्या रेस्टॉरंटच्या किरकोळ विक्रीतही नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिटेलर्स असोसिएशनचे सीईओ कुमार राजगोपालन म्हणाले की, बहुतांश राज्यांनी रिटेल व्यवसायाला मोकळा हात दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट मंदावली आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. मात्र, दिल्ली आणि हरियाणामध्ये अद्याप काही निर्बंध असून याचा परिणाम होत आहे.
‘त्या’ व्यापाऱ्यांसाठी बजेट देणार खुशखबर; जाणून घ्या, काय आहे केंद्र सरकारचा विचार..?