दिल्ली : पाकिस्तानने भारताला अफगाणिस्तामध्ये गहू पोहोच करण्यास परवानगी दिली आहे. सोमवारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी याला दुजोरा दिला आहे. भारताचा गहू आता पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानची राजधानीच्या शहरात पोहोचणार आहे. त्यासाठी पाकिस्तानने भारतीय ट्रकना येथून जाण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार डझनभर भारतीय ट्रक पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात जातील.
अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, भारतीय ट्रक 21 फेब्रुवारीपासून निघण्यास सुरुवात करतील. वाघा बॉर्डर पार केल्यानंतर गव्हाने भरलेले हे ट्रक प्रथम लाहोरला जातील. तेथून दुसऱ्या दिवशी पाकिस्तानातील तोरखाम येथून बॉर्डर पार करुन हे ट्रक अफगाणिस्तानातील जलालाबाद येथे पोहोचतील.
भारताने तीन महिन्यांआधी अफगाणिस्तानला 50 हजार मेट्रिक टन गहू देण्याची घोषणा केली होती. याशिवाय भारताने संघर्ष करणाऱ्या अफगाणिस्तानला जीवनरक्षक औषधे आणि इतर उपकरणे देऊन मदत करण्याची घोषणा केली होती. पण भारताची मदत अफगाणिस्तानला मिळण्यासाठी पाकिस्तानची सहमती आवश्यक होती. मात्र, पाकिस्तानने यामध्ये अडचणी निर्माण केल्या.
त्यामुळे भारताने औषधे, कोरोना प्रतिबंधक लसी हवाई मार्गे अफगाणिस्तानला दिली होती. मात्र, गहू देण्यासाठी पाकिस्तानबरोबर चर्चा सुरू होती. रस्ता वाहतुकीमार्गे गहू अफगाणिस्तानला देण्याची योजना होती. अखेर दोन महिन्यांनंतर पाकिस्तानने यास मंजुरी दिली. त्यामुळे आता पाकिस्तानमार्गे गहू अफगाणिस्तानमध्ये रवाना होणार आहेत.
अफगाणिस्तानातील परिस्थिती सध्या गंभीर आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे, की भारतीय वाहनांना विशेष बंदोबस्तात पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही महिन्यांत पाकिस्ताननेही स्वत: अफगाणिस्तानला औषधे आणि अन्नधान्य पाठवले आहे. गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. दहा लाखांहून अधिक मुले उपासमारीच्या मार्गावर असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. सध्या अफगाणिस्तानच्या नव्या सरकारला कोणत्याही देशाने मान्यता दिलेली नाही, त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय मदत थांबली आहे.
.. ‘तसे’ घडले तरच अफगाणिस्तानला मिळणार मदत.. तालिबान्यांकडून हवेय ‘हे’ आश्वासन..