Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Blog : शेतकरी उत्पादक कंपन्या आणि अभिमन्यू..!

सन २०१३ पासून कंपनी कायद्यातील बदलानुसार उत्पादक कंपन्या तयार व्हायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना एका दिवसात एका प्रमाणपत्राच्या आधारावर थेट अंबानी, टाटा सारखे मोठे उद्योजक बनवण्याचे स्वप्न दाखवायला सुरुवात झाली. टाटा अन् अंबानी यांच्या कंपन्या अन् शेतकऱ्यांच्या कंपन्या एकाच ROC या ठिकाणी नोंदवलेल्या असल्याने आता शेतकरी अन् अंबानी सारख्या दर्जाचे झाले, असे भासवले गेले. प्रत्यक्षात, टाटा अन् अंबानी ना भांडवली बाजारातून भांडवल उभा करण्याची जी मुभा देण्यात आली आहे ती मात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांना नाकारलेली आहे! सहज उपलब्ध होऊ शकणारे भांडवल शेतकऱ्यांच्या कंपनीला का नाकारले? हे अजूनही कुणी सांगू शकलेले नाही.

Advertisement

लेखक : डॉ. भारत करडक (संचालक, नेवासा तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., करडकवाडी, नेवासा फाटा, नेवासा, अहमदनगर)

Loading...
Advertisement

यानंतर शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना कागदपत्रे गोळा करून पळवायला सुरुवात केली. इक्विटी ग्रँट, विनातरण कर्ज, स्मार्ट, पोक्रा, वर्ल्ड बँक, safc, macp अश्या नावाने सर्वच योजनेत कंपन्यांनी सहभाग घेतला. अनेक ट्रॉल्या भरून कागदपत्रे सादर केली. परंतु सरकारी मर्यादेनुसार येथे निवडक कंपन्यांचे घोडे गंगेत न्हाले. बाकीच्यांचे शिंगरू हेलपाट्यानेच मेले! आता तब्बल सात आठ वर्षांनंतर कंपन्यांचे संचालक पुरते थकले अन् दमले आहेत. परंतु कंपनी सेक्रेटरी ने पूर्तता ना केलेल्या कागदपत्रांमध्ये शासकीय दंड लागू झाल्याने संचालकांना लाखो रुपये देणेदारी दिसू लागली आहे. उत्पादक कंपन्यांच्या संचालकांची DIN नंबर बाद झाले आहेत.  त्यात पुन्हा आत्मनिर्भर भारताचे नगारे वाजू लागले आहेत. अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड मधून पैसे मिळतील अशी आशा वाटल्याने पुन्हा एकदा ट्रॅक्टर भर कागदपत्रे घेवून संचालक शासकीय कार्यालयात जावून बसू लागले आहेत.

Advertisement

काल स्मार्ट योजनेतील यशस्वी कंपन्यांची नावे जाहीर झाली. एकूण अर्जाच्या २५% कंपन्यांना अनुदान कम कर्ज प्रकरण मंजूर झाले. त्यात ४०% स्व भांडवल जमा करायला कंपन्यांना पुन्हा पळापळ करावी लागणार आहे. कारण बँका त्यांना एक रुपया देखील कर्ज देत नाहीयेत. कारण तिथे एक मालक नसल्याने बँकेला कर्ज फेडीची शास्वती नाही. महाभारतात, जेंव्हा अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यासाठी निघाला तेंव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी त्याला यशस्वी भव: असा आशीर्वाद दिला. तेंव्हा त्याची आई द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला विचारले, विजयी भव: असा आशीर्वाद का दिला नाहीस? त्यावर भगवान श्रीकृष्णा ने स्मित केले…. शेवट आपल्याला माहीत आहे! अभिमन्यू ने चक्रव्यूह भेदले परंतु तो त्यातून बाहेर पडू शकला नाही. शेतकऱ्यांची अवस्था अशीच अभिमन्यू सारखी झालीय. उत्पादक कंपनी स्थापन तर केली पण आता त्यात पुढे काय? अन् नसेल तर बाहेर कसे जावे? यात तो अडकलाय!

Advertisement
Advertisement

Leave a Reply