मुंबई : बेंगळुरू येथील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी Oben EV ने भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल जाहीर केली आहे. कंपनीने त्याचे नाव Oben Ror ठेवले आहे. विशेष म्हणजे, ही बाईक फुल चार्ज झाल्यावर 200KM पर्यंत रेंज देऊ शकते. हाय-स्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल पुढील महिन्यात देशात लाँच केली जाईल आणि 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत वितरण सुरू होईल.
ओबेन EV ने इलेक्ट्रिक दुचाकीबद्दल जास्त तपशील उघड केलेले नाहीत. तथापि, एक्सप्रेस ड्राइव्हच्या रिपोर्टनुसार, हाय-स्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकलचा वेग 100 किमी प्रतितास असेल आणि फक्त 3 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग वाढेल. शिवाय, कंपनीचा दावा आहे की ते आदर्श परिस्थितीत एका चार्जिंगवर 200 किमी पर्यंत चालू शकते तर चार्जिंगची वेळ 2 तास असेल. इलेक्ट्रिक मोटरसायकल तीन प्रकारात सादर केली जाईल. कंपनीने सध्या त्याची किंमत जाहीर केलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार त्याची किंमत 1 लाख ते 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. पुढील 2 वर्षांत दर 6 महिन्यांनी एक नवीन उत्पादन लाँच करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी एथर एनर्जीसाठी जानेवारी हा उत्तम महिना ठरला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 2,825 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या, जो कंपनीसाठी एक विक्रम आहे. Ather Energy ने अहवाल दिला, की जानेवारी 2022 मध्ये त्यांच्या विक्रीत वार्षिक 366 टक्के वाढ झाली आहे. कंपनी सध्या तिच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 Plus आणि Ather 450X विक्री करत आहे. विशेष म्हणजे, या कंपनीने नावाजलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार टक्कर दिली आहे. नव्या वर्षातच्या सुरुवातीलाच चांगली कामगिरी केली आहे. आता आणखी एका इलेक्ट्रिक दुचाकीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आगामी काळात देशातील मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी दिसतील.