.. म्हणून अफगाणी लोकांना पाकिस्तानमध्ये मिळेना एन्ट्री; पहा, आता पाकिस्तानने काय केलेय..?

दिल्ली : पाकिस्तानात वैद्यकीय उपचारांसाठी मदत मागणाऱ्या अफगाण नागरिकांना व्हिसासाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. लोकांना व्हिसा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. व्हिसा अर्जदारांनी सांगितले की, त्यांनी अनेक महिन्यांपूर्वी पाकिस्तानला व्हिसासाठी अर्ज केला होता, परंतु अद्याप त्यांचा व्हिसा जारी करण्यात आलेला नाही.
अफगाणिस्तानमध्ये वैद्यकिय सुविधा नाहीत. ज्या काही आहेत त्या सुद्धा फारशा चांगल्या नाहीत. मोठ्या आजारांच्या रुग्णांना तर उपचारांसाठी अन्य देशात जाण्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. अशा वेळी अफगाणिस्तान मधील लोक पाकिस्तानला प्राधान्य देतात. परंतु, आता पाकिस्ताननेही कठोर धोरण घेतले आहे. त्यामुळे अफगाणी नागरिकांना व्हिसासाठी कित्येक महिने वाट पहावी लागत आहे.
पाकिस्तान व्हिसासाठी ऑनलाइन सेवा देणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, की त्यांनी सुमारे 750 अर्जदारांसाठी व्हिसा फॉर्म भरले आहेत, परंतु त्यापैकी कोणालाही अद्याप व्हिसा मिळालेला नाही. ते म्हणाले, की पाकिस्तान लोकांना त्यांच्या व्हिसाबद्दल काहीच माहिती सांगत नाही आणि लोकांनी सुमारे 80-100 डॉलर खर्च करूनही पाकिस्तान वाटेल त्या वेळी आणि मनमानी पद्धतीने हे व्हिसा रद्द करून टाकतो.
याआधीही या संदर्भात काही करार झाले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. व्हिसा तसेच पाकिस्तानकडून वस्तू हस्तांतरणाच्या समस्या आहेत. यापूर्वी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी अफगाणी नागरिकांसाठी व्हिसा अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात मदत करण्याचे वचन दिले होते, परंतु तसे मात्र प्रत्यक्षात घडलेले नाही, असे तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. या संकटात देशातील सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. या संकटात देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. देशातील तब्बल 5 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. सध्याची बेरोजगारी अशीच चालू राहिल्यास 2022 च्या मध्यापर्यंत 9 लाख लोक नोकऱ्या गमावतील असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिला आहे.
देशातील आर्थिक संकट आणि प्रशासनातील बदल यामुळे बेरोजगारीत लक्षणीय वाढ झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. बुधवारी जारी केलेल्या मूल्यांकन अहवालात, ILO ने देशातील वाढत्या बेरोजगारीबाबत इशारा दिला आहे. असे म्हटले आहे, की बेरोजगारीचा सध्याचा कल असाच सुरू राहिल्यास 2022 च्या मध्यापर्यंत सुमारे 9 लाख लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतील, टोलो न्यूजने वृत्त दिले आहे. ILO च्या अहवालानुसार 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत रोजगारामध्ये 16 टक्क्यांनी घट झाली आणि 2022 च्या मध्यापर्यंत ती 28 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.