.. म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान चाललेत चीनला.. पहा, चीनकडे काय करणार मागण्या..?

दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुढील महिन्यात चीनला जाणार आहेत. देशातील ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता इम्रान खान तेथेही कर्जाची मागणी करतील असा अंदाज आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांची चीन भेट तब्बल दोन वर्षांनी होत आहे. या दरम्यान, दोन्ही देशांमध्ये नवीन प्रकल्पांवर चर्चा होणार असल्याचे समजते. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे. त्यामुळे या देशाला अन्य देशांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. चीनने याआधीही कर्ज दिले आहे. मात्र, आता पुन्हा चीनकडे कर्ज मागण्यात येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
इम्रान खान 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान ते बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील आणि चिनी नेत्यांची भेट घेतील, असे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान या भेटी दरम्यान चीनकडून 10 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी करणार आहेत. हा पैसा पाक-चायना इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा पाकिस्तानची अर्थव्यवस्था गंभीर आर्थिक संकटात आहे. महागाई, चलनाचे अवमूल्यन आणि परकीय चलनाचा साठा कमी झाल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये सुद्धा सरकार विरोधात नाराजी वाढली आहे.
याशिवाय सत्ताधारी पक्षाला विश्वासार्हतेच्या संकटाचाही सामना करावा लागत आहे. कारण CPEC मध्ये चीनच्या मदतीमुळे देशात आर्थिक आणि सामाजिक बदल होताना दिसत नाहीत. या मोठ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की जर चीनने 10 अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्जाचे आश्वासन दिले तरी यामुळे पाकिस्तानचा फायदा होईल असे नाही. तर या कर्जामुळे देशावरील कर्जाचा भार आणि जबाबदाऱ्या आणखी वाढतील असे सांगण्यात आले.