भारीच.. आता गुगल-एअरटेल एकसाथ.. ! ‘त्यासाठी’ दोन्ही कंपन्यांनी केलाय कोट्यावधींचा करार; जिओला बसणार का झटका..?
मुंबई : देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आणि जगातील दिग्गज टेक कंपनी गुगलने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांनी भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमध्ये, Google त्याच्या Google फॉर इंडिया डिजिटायजेशन निधीतून एअरटेलमध्ये तब्बल 1 अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहे. गुगल कंपनी 700 दशलक्ष गुंतवून एअरटेलमधील 1.28 टक्के स्टेक घेणार आहे. बहु-वर्षीय करारांतर्गत 300 दशलक्ष डॉलर गुंतवणूकीची घोषणा केली आहे.
टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलच्या मते, या नवीन भागीदारीमुळे स्मार्टफोन आणि ग्राहकांपर्यंत पोहोचणे आधिक सोपे होणार आहे. तसेच, 5G नेटवर्कच्या जगात भागीदारी मजबूत होईल. Google देशात क्लाउड इकोसिस्टम मजबूत करेल. Google कडून 300 दशलक्ष गुंतवणुकीसह Airtel चा विस्तार केला जाईल. याबरोबरच वापरकर्त्यांना परवडणाऱ्या दरात डिजिटल प्लान्स दिले जातील. तज्ज्ञांच्या मते, Google-Airtel करारामुळे देशाचा डिजिटल मार्ग अधिक सोपा होईल. यासह, वापरकर्त्यांना किफायतशीर दरात इंटरनेटसह इतर डिजिटल सेवा प्रदान करण्यात मदत होईल. एअरटेलमधील गुंतवणुकीसह, गुगलला 71,176,839 इक्विटी शेअर्स 734 रुपये प्रति शेअर दराने मिळतील. एकूण, Google ला एअरटेलला 5,224.38 कोटी रुपये ($700 दशलक्ष) द्यावे लागतील.
या भागीदारीच्या घोषणेसह, सुरुवातीच्या व्यापारात शेअर 1.95 टक्क्यांनी वाढून 721 रुपयांच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. सध्या, एअरटेलचा प्रवर्तक समूह मित्तल कुटुंब आणि सिंगटेलकडे टेल्कोचा 55.93 टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित हिस्सा लोकांकडे आहे. मित्तल कुटुंबाकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे 24.13 टक्के हिस्सा आहे, तर सिंगटेलकडे 31.72 टक्के हिस्सा आहे.
दरम्यान, या दोन्ही कंपन्यांचा हा करार रिलायन्स जिओसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण, जिओ सुद्धा देशात लवकरच 5G नेटवर्क लाँच करण्याच्या तयारीत आहे. इतकेच नाही तर कंपनीने 6G चीही तयारी सुरू केली आहे. देशातील डिजिटायजेशनच्या दृष्टीने हा एक महत्वाचा निर्णय ठरणार आहे. असे असताना आता एअरटेलनेही या स्पर्धेत उतरण्याचे ठरवलेले दिसत आहे.