..’त्या’ बँक खात्यांबाबत मोदी सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत; पहा, खातेधारकांचा ‘कसा’ होईल फायदा..?
मुंबई : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. कोरोनाच्या सावटात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून देशातील करदात्यासह सर्वच क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, काही अहवालांवर विश्वास ठेवला तर 2022 च्या अर्थसंकल्पात जन धन खात्यांबाबतही मोठी घोषणा केली जाऊ शकते. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकार त्यांना अटल पेन्शन योजनेशी जोडण्यात येऊ शकते.
केंद्र सरकार येत्या अर्थसंकल्पात जन-धन खात्यांच्या डिजिटायजेशनवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या तयारीत आहे. अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या खात्यांसाठी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याबरोबरच, सरकार त्यांना अटल पेन्शन योजना आणि सुकन्या समृद्धी योजनांबरोबर जोडण्याची घोषणा करू शकते. जन-धन सेवेच्या विस्ताराचा हा तिसरा टप्पा असेल, असे सांगण्यात आले. या अंतर्गत या ग्राहकांना डोअर स्टेप बँकिंग तसेच डिजिटल खातेधारकांसारख्या सुविधांशी जोडण्याचे काम केले जाईल. डिजिटल बँकिंगमध्ये सहभागी झाल्यानंतर या खातेदारांना मोबाईलवरून बँकिंग सेवेसारख्या सुविधाही मिळू लागतील.
अहवालानुसार, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांना जन-धन खात्यांमधून जोडण्याची तयारीही सुरू आहे. त्यानंतर या योजनांची रक्कम जन-धन खात्यातून जमा करता येईल. सरकारी आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 44.44 कोटी जन धन खाती उघडण्यात आली असून त्यात 1.57 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. देशातील बहुतांश जनधन खाती सरकारी बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रधानमंत्री जन धन योजना ही सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे आणि या योजनेचा उद्देश अधिकाधिक लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडणे हा आहे. जन धन खात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
दरम्यान, प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजेच PMJDY अंतर्गत सुरू बँक खात्यांमधील ठेवींची रक्कम 1.5 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. सरकारने साडेसात वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली होती. वित्त मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, PMJDY अंतर्गत खात्यांची संख्या 44 कोटींवर पोहोचली आहे. या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम दीड लाख कोटींहून अधिक झाली आहे.
या योजनेच्या पहिल्या वर्षात 17.90 कोटी खाती उघडण्यात आली. जन धन खात्यातील शिल्लक रक्कम खातेधारकाने केलेल्या व्यवहारांवर अवलंबून दररोज बदलू शकते. सरकारने गेल्या महिन्यात सांगितले होते, की 8 डिसेंबर 2021 पर्यंत जन धन खात्यांमध्ये शून्य शिल्लक असलेल्या खात्यांची संख्या 3.65 कोटी होती. एकूण जनधन खात्यांपैकी हे प्रमाण 8.3 टक्के आहे. आकडेवारीनुसार, 29.54 कोटी जन धन खाती ग्रामीण आणि निमशहरी बँक शाखांमध्ये आहेत.