अर्र.. घर खरेदीदारांसाठी आलीय टेन्शन देणारी बातमी; नव्या वर्षातही जादा खर्च करण्याची तयारी ठेवा; पहा, काय म्हणतोय अहवाल ?
दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात ही बातमी आधीच महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या लोकांना त्रासदायक ठरू शकते. वास्तविक, या वर्षात देशातील घरांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट कंपन्यांची संघटना असलेल्या क्रेडाईच्या सर्वेक्षण अहवालानुसार, 21 टक्के विकासकांनी सांगितले की, यावर्षी घरांच्या किमती 30 टक्क्यांनी वाढतील. तसेच सुमारे 60 टक्के विकासकांना या वर्षात मालमत्तेच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट कंपन्यांचे म्हणणे आहे, की सुमारे 35 टक्के विकासकांनी 10-20 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर घरांच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे 25 टक्के लोकांचे मत आहे. हे सर्वेक्षण 30 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये देशातील 1 हजार 322 विकासकांशी चर्चा झाली आहे. क्रेडाईच्या म्हणण्यानुसार, बांधकाम साहित्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने मालमत्तेच्या किमतीत वाढ होऊ शकते.
क्रेडाईच्या मते, सर्वेक्षण केलेल्या 21 राज्यांतील विकासकांनी सांगितले, की उद्योग कोरोना संकटातून सावरत आहे. मागणी अजूनही कोरोनाआधीच्या पातळीवर पोहोचलेली नाही. अशा स्थितीत इमारत बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने घरांच्या किमतीत वाढ करणे गरजेचे झाले आहे. सर्वेक्षणात दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे येथील रिअल इस्टेट विकासकांचा समावेश आहे.
असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट कंपन्यांनी ‘रिअल इस्टेट डेव्हलपर परसेप्शन सर्व्हे-2022’ अहवालात म्हटले आहे, की व्यवसाय करणे सुलभ झाल्यास 92 टक्के विकासक यावर्षी नवीन प्रकल्प हाती घेतील. पुढील महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्प 2022 मध्ये सरकारने व्यवसाय सुलभतेबाबत सुविधा दिल्यास नवीन वर्षात रिअल इस्टेट विकासकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल.
क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटौदिया म्हणाले की, कोरोना काळात ऑनलाइन विक्रीत वाढ करण्यासाठी विकासक डिजिटल विक्रीवर भर देत आहेत. सुमारे 39 टक्के विकासक त्यांची 25 टक्के विक्री ऑनलाइन करत आहेत. ते म्हणाले की, सध्या कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करील, असे अपेक्षित आहे.
घर खरेदीचं स्वप्न हे स्वप्नच राहणार..? बिल्डर्सनी घेतलाय हा मोठा निर्णय..!