अर्र.. आलीय टेन्शन देणारी बातमी..! इंधनाच्या बाबतीत घडलेय ‘असे’ काही; पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता
दिल्ली : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. असे असले तरी देशात 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका असल्याने इंधनाच्या किंमती वाढलेल्या नाहीत. मात्र, काळजीत टाकणारी बातमी मिळाली आहे. देशातही तेलाचे उत्पादन घटले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्येही देशात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाली. सरकारी मालकीच्या ओएनजीसीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देशातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांनी घट झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेल हे कच्चे तेल शुद्ध करून बनवले जाते. मागणीपेक्षा कमी देशांतर्गत पुरवठ्यामुळे देशाला कच्च्या 85 टक्के तेल दुसऱ्या देशांकडून खरेदी करावे लागते. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढत आहे. त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादनातही घट होत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डिसेंबर 2021 मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन 25.1 लाख टन होते, जे एका वर्षापूर्वीच्या 25.5 लाख टन आणि 26 लाख टनांच्या उद्दिष्टापेक्षा कमी आहे. तथापि, नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या 24.3 लाख टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण जास्त आहे.
भारतातील सर्वात मोठी तेल उत्पादक ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने डिसेंबरमध्ये 1.65 दशलक्ष टन क्रूडचे उत्पादन केले, जे तीन टक्क्यांनी घसरले. तथापि, ऑइल इंडिया लिमिटेडचे उत्पादन 5.4 टक्क्यांनी वाढून 2,54,360 टन झाले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर) कच्च्या तेलाचे उत्पादन 2.63 टक्क्यांनी घसरून 22.3 दशलक्ष टन झाले आहे. ओएनजीसीचे उत्पादन चार टक्क्यांनी घसरून 14.6 दशलक्ष टन झाले. बुधवारी सलग 75 व्या दिवशी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.