मुंबई : घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. आता एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतर जास्त वाट पाहावी लागणार नाही. सरकारी मालकीच्या तेल वितरण कंपनी इंडियन ऑइल (IOCL) च्या तत्काळ एलपीजी सेवेद्वारे ग्राहकांना फक्त 2 तासांत गॅस टाकी मिळणार आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही एलपीजी बुक कराल त्याच दिवशी तुम्हाला गॅस टाकी मिळेल. इंडियन ऑइलने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
IOCL ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उद्योगात प्रथम, इंडियन ऑइलची इंडेन तत्काळ सेवा बुकिंगच्या 2 तासांच्या आत एलपीजी रिफिलचे वितरण करण्याचे आश्वासन देते. ग्राहक IVRS, Indian Oil वेबसाइट किंवा Indian Oil One App द्वारे अगदी नाममात्र प्रीमियमवर सेवेचा लाभ घेऊ शकतात. सध्या ही सेवा हैदराबादमधील निवडक वितरकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरातही लागू होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप फार काही माहिती मिळालेली नाही.
रिफिल बुकिंग आणि इतर ग्राहक-संबंधित उपक्रमांसाठी इंडियन ऑइलने गेल्या वर्षी मिस्ड-कॉल सुविधा सुरू केली होती. जेणेकरून ग्राहकांना फोन नंबरद्वारे गॅस टाकी आणि नवीन एलपीजी कनेक्शनसाठी सहज नोंदणी करता येईल. ग्राहक फक्त मिस कॉल देऊन एलपीजी बुक करू शकतात. यामुळे वेळेचा अपव्यय कमी होईलच, त्याचबरोबरच ही अतिशय जलद आणि सोयीस्कर पद्धत राहणार आहे.
दरम्यान, आताच्या जमान्यात गॅस बुकींग अगदीच झटपट होते. ऑनलाइन पद्धतीने गॅस नोंदवता येतो. यामुळे लोकांना गॅस डिलरशीपला कॉल करण्याचा किंवा गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. विशेष म्हणजे, इंडेन गॅस, एचपी गॅस, भारत गॅस या सर्वांच्या ऑनलाइन बुकिंग सेवा आहेत. आता आणखी नव्या पद्धतीने तुम्हाला गॅस बुकिंग करता येणार आहे.
होय, आता पोस्ट पेमेंट बँकेने सुद्धा ही सुविधा देऊ केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मोबाइल बँकिंग अॅपद्वारे गॅस बुक करता येणार आहे. बँकेने ट्विट केले आहे, की IPPB त्यांच्या मोबाइल बँकिंग अॅपद्वारे एलपीजी गॅस सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग सुलभ आणि सुरक्षित करते.
वाव.. भारीच आहे की..! गॅस बुकिंगवर मिळवा तीन हजारांपर्यंत कॅशबॅक; पहा, कुणी आणलीय ही भन्नाट ऑफर