नव्या वर्षात गुजरातची चांदीच..! रिलायन्स नंतर अदानी ग्रुपही करणार कोट्यावधींची गुंतवणूक; पहा, काय आहे प्लान
मुंबई : देश विदेशातील प्रसिद्ध कंपनी रिलायन्सने गुजरातमधील प्रकल्पात 5.95 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनीही गुजरातकडे मोर्चा वळवला आहे. अदानी ग्रुपही गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गुजरातला लॉटरीच लागली आहे.
अदानी उद्योग समूहाने गुजरातमध्ये पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी आणि अन्य व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी दक्षिण कोरियन कंपनी पॉस्कोबरोबर तब्बल 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 37 हजार कोटी रुपयांचा प्राथमिक करार केला आहे. हा करार अद्याप अस्तित्वात आलेला नाही. करार प्रत्यक्षात आल्यानंतर अदानी समूह गुजरात राज्यातील या प्रकल्पात प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.
या दोन्ही कंपन्या आपल्या पातळीवर प्रकल्पात किती गुंतवणूक करतील याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भागीदारीचा तपशीलही देण्यात आलेला नाही. गुजरात राज्यातील मुंदडा येथे हा प्रकल्प सुरू होणार आहे. हा प्रकल्प साधारण 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पॉस्को ही कंपनी दक्षिण कोरियातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी आहे. कंपनीने हा करार केल्याने कंपनीचे भारतात पहिला पोलाद प्रकल्प सुरू करण्याचे स्वप्नही या निमित्ताने पूर्ण होणार आहे.
याआधी भूसंपादनाच्या मुद्द्यावर ओडिशा राज्यात कंपनीस मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर कंपनीने तब्बल 12 अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पातून माघार घेतली होती. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा अदानी उद्योग समूहाबरोबर भागीदारीत पोलाद प्रकल्प सुरू करण्याचे निश्चित केले आहे. सध्या देशात JSW स्टील ही सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी आहे.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये गुजरातमध्ये हरित ऊर्जा आणि इतर प्रकल्पांमध्ये तब्बल 5.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी एका निवेदनात सांगितले, की कंपनी राज्यात एक लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमच्या विकासासाठी गुंतवणूक करणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनी सौर फोटोवोल्टिक मॉड्यूल, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलायजर्स, ऊर्जा साठवण बॅटरी निर्मितीसाठी कारखाने उभारण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. याबरोबरच येत्या 3 ते 5 वर्षांत 25 हजार कोटी रुपये विद्यमान प्रकल्प आणि नवीन उपक्रमांमध्ये गुंतवले जातील.