सोलापूर : सध्या महाराष्ट्रातील स्थानिक बाजारात केळी फळाला फक्त ७-८ रुपये किलोचा भाव मिळत आहे. अशावेळी निर्यातक्षम केळीला चांगला भाव मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि इतर भागातून केळीची निर्यात वाढली आहे. चांगल्या मालास इथे ११ रुपयांचा भाव मिळत आहे. दोन महिन्यांत ५३ शेतकऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून इराणसह अन्य देशांत केळी निर्यात करीत आहेत.
जादा दरामुळे पिंपळनेर (ता. माढा) परिसरातील अनेक शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादनावर भर देत आहेत. निमगाव टें. येथील तरुण शेतकरी नवनाथ बापूराव शिंदे (वय ३२) यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उच्च गुणवत्तापूर्ण केळीला इराणमध्ये प्रतिकिलो ११ रुपये दर मिळत आहे. व्यापारी मनोज चिंतामण यांनी याबाबत दिव्य मराठीशी बोलताना म्हटले आहे की, पिंपळनेर परिसरातून रोज ४० टन केळी निर्यात होत आहे. सध्या स्थानिक बाजारात प्रतिकिलो पाच ते सहा रुपये दर आहे. इराण, इराकसह आखाती देशांमध्ये केळीला प्रतिकिलो ११ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
नवनाथ शिंदे (शेतकरी, निमगाव टें., ता. माढा) यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, दर्जेदार रोपांची निवड, सेंद्रिय खतांचा वापर, पाणी आणि विद्राव्य खतांचे तज्ञांच्या सल्ल्याने योग्य नियोजन यामुळे झाडांची चांगली वाढ झाली. एकसारख्या घडांचे उत्पादन मिळाले. केळीची प्रतही चांगली आहे. रोपे, खते, कीडनाशके, केळी रोपांसाठी पट्ट्या, ठिबक सिंचन यासाठी एकरी ९५ हजारांचा खर्च आलेला आहे. ४० ते ४५ टन केळीचे उत्पादन हाती येणार आहे. प्रतिटन दहा ते अकरा हजार रुपये दर मिळत आहे. खर्च वजा जाता सव्वा एकरात तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
- महागाईच्या काळात मिळाली खुशखबर..! घरखर्चाचे बजेट होणार हलके; कंपन्यांनी खाद्यतेलाबाबत घेतलाय ‘हा’ निर्णय
- टोमॅटो 25 पैसे किलो, तर कारले 2 रुपये..! ‘बळी’राजाचा वाहतूक खर्चही निघेना, पाहा कुठे मिळाला हा ‘विक्रमी’ भाव..?