रिलायन्सचा आता गुजरातकडे मोर्चा..! ‘त्या’ प्रकल्पात करणार कोट्यावधींची गुंतवणूक; पहा, नेमका काय आहे प्लान ?
मुंबई : देश विदेशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये गुजरातमध्ये हरित ऊर्जा आणि इतर प्रकल्पांमध्ये तब्बल 5.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी एका निवेदनात सांगितले, की कंपनी राज्यात एक लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमच्या विकासासाठी गुंतवणूक करणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनी सौर फोटोवोल्टिक मॉड्यूल, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलायजर्स, ऊर्जा साठवण बॅटरी निर्मितीसाठी कारखाने उभारण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. याबरोबरच येत्या 3 ते 5 वर्षांत 25 हजार कोटी रुपये विद्यमान प्रकल्प आणि नवीन उपक्रमांमध्ये गुंतवले जातील.
याशिवाय, रिलायन्सने जिओचे स्वतःचे टेलिकॉम नेटवर्क 5G मध्ये रूपांतरित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांत 7,500 कोटी रुपये आणि पुढील 5 वर्षांत रिलायन्स रिटेलमध्ये 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
व्हायब्रंट गुजरात समिट 2022 च्या कार्यक्रमा दरम्यान, RIL ने गुरुवारी गुजरात सरकारबरोबर एकूण 5.95 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे दहा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कंपनीने गुजरात सरकारबरोबर चर्चा करून कच्छ, बनासकांठा आणि धोलेरा येथे 1 लाख मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने कच्छमध्ये 4.5 लाख एकर जमिनीची मागणी केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या आठवड्यात घोषणा केली की त्यांनी तीन टप्प्यांत यूएस डॉलर बाँड जारी करून 4 अब्ज डॉलरची रक्कम उभारली आहे. भारताकडून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विदेशी चलन रोखे जारी करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नोट्स तीन वेळा ओव्हर-सबस्क्राइब झाल्या होत्या. ज्यामध्ये पहिला टप्पा 11.5 अब्ज डॉलर्स राहिला आहे. समूहाने 10 वर्षांच्या टप्प्यात 1.5 अब्ज डॉलर उभे केले आहेत. तर, 30 वर्षांच्या करारात 1.75 अब्ज आणि 40 वर्षांच्या करारात 750 दशलक्ष डॉलर जमा केले आहेत.