अरे वा.. भारत ‘तिथे’ ही बनलाय आधिक सामर्थ्यवान; पहा, कुठे आहेत पाकिस्तान-अफगाणिस्तान ?
मुंबई : सध्याच्या काळात जगात भारताचा दबदबा वाढला आहे. अन्य देशांच्या तुलनेत आधिक संकटांचा सामना करुन देखील भारताने आपल्या सामर्थ्यात वाढ केली आहे. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. मग, ते कोणतेही क्षेत्र असो भारत तेथे आज भक्कमपणे उभा आहे. सध्या भारतीय पासपोर्टचाच विचार केला तर देशाचा पासपोर्ट याआधीच्या तुलनेत आधिक ताकदवान बनला आहे.
भारतीय पासपोर्ट आता जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत 83 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करते. त्यात एकूण 199 देशांच्या पासपोर्टचा समावेश आहे. सन 2021 मध्ये भारतीय पासपोर्ट 199 देशांच्या क्रमवारीत 90 व्या क्रमांकावर होता, परंतु 2022 मध्ये भारतीय पासपोर्ट 7 क्रमांकांनी झेप घेत 83 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेन्ले पासपोर्ट इंडेक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत हे स्पष्ट झाले आहे की, गेल्या वर्षभरात भारतीय पासपोर्टची ताकद वेगाने वाढली आहे. भारतीय पासपोर्टच्या या अधिकाराचा फायदा भारतीय पासपोर्ट असलेल्या सर्व भारतीयांना मिळणार आहे. आता भारतीय पासपोर्टधारक व्हिसाशिवाय जगातील 60 देशांमध्ये सहज जाऊ शकतात. गेल्या वर्षापर्यंत एकूण 58 देशांना भारतीय पासपोर्टद्वारे व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी होती.
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने जारी केलेल्या डेटाचा विचार करून हेन्ली पासपोर्ट इंडेक्स जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करते. कोणत्याही देशाच्या पासपोर्टची ताकद त्या देशाच्या पासपोर्टच्या मदतीने व्हिसाशिवाय किती देशात प्रवास करता येईल यावर अवलंबून असते. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत दोन देशांचे पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहेत. होय, सिंगापूर आणि जपानचे पासपोर्ट या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही देशांच्या पासपोर्टवर जगातील एकूण 192 देशांचा प्रवास व्हिसा नसला तरीही करता येतो.
भारतीय पासपोर्टच्या मदतीने 60 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येतो. तर आपल्या शेजारी देश पाकिस्तानच्या पासपोर्टने फक्त 32 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येतो. या क्रमवारीत अफगाणिस्तान आता खूप मागे पडला आहे. अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीमुळे त्याचा पासपोर्टही पूर्णपणे कमकुवत झाला आहे.