अर्र.. तिकडे कच्च्या तेलाचा उडालाय भडका..! इकडे मात्र निवडणुकांचा इफेक्ट; पहा, काय आहे तेलाचे गणित ?
मुंबई : देशात बुधवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. दुसरीकडे मात्र कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी प्रति बॅरल 84 डॉलर वर पोहोचल्या आहेत. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइल 5 नोव्हेंबर 2021 रोजी प्रति बॅरल 82.74 डॉलरवर होते. पण 1 डिसेंबर रोजी ते प्रति बॅरल 68.87 डॉलरपर्यंत खाली आले. यानंतर पुन्हा दर वाढू लागले आणि बुधवारी क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 83.82 डॉलरवर पोहोचली. 4 नोव्हेंबर 2021 पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात आहेत.
याआधी जून 2017 मध्ये दैनंदिन किंमतीच्या सुधारणेनंतर तेलाच्या किमतीत वाढ न होण्याचा हा मोठा कालावधी आहे. 4 नोव्हेंबर 2021 रोजी डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि पेट्रोलवर 5 रुपये प्रति लिटरने कपात करण्यात आली, ज्यामुळे इंधनाचे दर काही प्रमाणात कमी झाले. त्यानंतर देशातील बहुतांश राज्यांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅटमध्ये कपात केली. त्यामुळे इंधनाचे दर आणखी कमी झाले.
पंजाब आणि दिल्लीसारख्या इतर राज्यांनी नंतर दर कमी केले, परंतु पेट्रोल आणि डिझेलची मूळ किंमत 4 नोव्हेंबरपासून कायम आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये आहे. कोलकात्यातही किमती अनुक्रमे 89.79 आणि 104.67 रुपयांवर स्थिर आहेत. मुंबईत 94.14 रुपये आणि 109.98 रुपयांना उपलब्ध आहे. चेन्नईमध्येही 1 लिटर तेल 91.43 रुपये आणि 101.40 रुपयांना उपलब्ध आहे. बुधवारी देशभरात डिझेल आणि पेट्रोलचे दर बदलले नाहीत, परंतु स्थानिक स्तरावरील करांच्या आधारे किरकोळ दरांमध्ये फरक आहे.
दरम्यान, देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या काळात इंधनाच्या दरात वाढ करण्याचा सरकार विचार नाही. कच्च्या तेलाच्या किंमती कितीही वाढल्या तरी देशातील निवडणुका पाहता इंधनाचे दर वाढणार नाहीत, असेही सांगण्यात येत आहे.