आज सोन्याचे दरात वाढ, चांदीचे दर मात्र घटले.. जाणून घ्या, काय आहे सोने मार्केटमधील परिस्थिती
मुंबई : सध्याच्या काळात सोने आणि चांदीचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत. नव्या वर्षात सुद्धा हा ट्रेंड कायम राहिला आहे. आज बुधवारी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीत 0.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र 0.14 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
सोन्याचे भाव सध्या 48 हजारांपेक्षा थोडे कमी झाले आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स सोन्याची किंमत 0.10 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आता सोने 47 हजार 995 रुपये प्रति तोळा आहेत. दुसरीकडे, चांदीच्या किंमतीत 0.14 टक्क्यांनी घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 62,141 रुपये प्रति किलो आहे. विशेष म्हणजे, सोन्याचे दर कुठेही सारखे नाहीत. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे दर पाहण्यास मिळतात. सोन्याच्या दरावर जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम होत असतो.
सध्या जगभरात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. युरोप अमेरिकेत तर कोरोनाने थैमान घातले आहे. आपल्याकडेही मागील काही दिवसांपासून रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्यास सुरुवात केली आहे. या काळात सोन्यास मागणी वाढली आहे. कारण, सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. तसेच सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी वाढते. या कारणामुळे देशात सोन्यास मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून सोने दरात वाढ होताना दिसत आहे.
सोने मार्केटवर कोरोनाचा फारसा परिणाम झाल्याचे जाणवत नाही. कारण, मागील वर्षात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोन्याचे भाव वेगाने वाढले होेते. ऑगस्ट 2020 मध्ये तर सोने 56 हजार 200 रुपये असे सर्वाधिक होते. त्यानंतर मात्र दरात घट होत गेली. तरीही सध्या सोने 50 हजारांच्या आसपास आहे.