नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने देशातील अनेक कंपन्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच कामकाज सुरू केले आहे. कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली आहे. दुसरीकडे आता अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधाही दिली जात आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारही असे नियम आणण्याचा विचार करत आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्यायही मिळणार आहे.
वास्तविक, कामगार मंत्रालयाने वर्क फ्रॉम होमसाठी मसुदाही जारी केला आहे. या मसुद्यात मॅन्यूफॅक्चरिंग, खाणकाम आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कार्यालयांच्या कामकाजात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या वर्क फ्रॉम होम मसुद्यात आयटी क्षेत्रालाही नवीन नियमांमध्ये विशेष सूट मिळू शकते. यामध्ये आयटी कर्मचाऱ्यांनाही कामाच्या वेळेत सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबरोबरच सेवा क्षेत्राच्या सर्व गरजा लक्षात घेऊन हे विशेष मॉडेल पहिल्यांदाच तयार करण्यात आले आहे. याशिवाय कामगार मंत्रालयाने या नव्या मसुद्यावर सर्वसामान्यांकडून सूचनाही मागवल्या आहेत. कामगार मंत्रालय एप्रिलमध्ये या नियमांच्या अंमलबजावणीस सुरुवात करील, असे अपेक्षित आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका पाहता कंपन्या वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच कामकाजावर भर देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कार्यालये सुरू करण्यात आली. दुसऱ्या लाटेत पुन्हा बंद करण्यात आली. आताही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसत आहे. डिसेंबरपासून कार्यालये सुरू होताच तिसऱ्या लाटेने ती पुन्हा बंद करण्यास सुरुवात केली आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. रविवारी 2 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशात 1.23 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 12 आठवड्यांतील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात (डिसेंबर 20-26) 41,169 प्रकरणे नोंदवली गेली. म्हणजेच एका आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाचा दर जवळपास तिपटीने वाढला आहे. प्रकरणांमध्ये 82 हजारांनी वाढ झाली आहे.
जगभरात कोरोनाने परिस्थिती गंभीर बनली आहे. अमेरिका, युरोपमध्ये तर कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. येथे दररोज लाखोंच्या संख्येत रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या देशांमध्येही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.