मुंबई : कोरोनाच्या नवीन Omicron व्हेरिएंटने जगभरात थैमान घातले आहे. देशातही आता या व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर या संकटाचा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. सोने मार्केटवरही या व्हेरिएंटचा परिणाम जाणवत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यामुळे सोने 1835 डॉलरच्या पातळीर्यंत जाण्याची शक्यता आहे. जे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 2 टक्क्यांनी जास्त आहे. वाढलेले निर्बंध, लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या आर्थिक घडामोडींवर होणारे परिणाम यामुळे सोन्याच्या मागणीला आणखी वेग येईल. सोन्याचा भाव 47,000 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान जातील, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याआधी काल सोमवारी सोन्याचे दर कमी झाले होते.
आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 0.18 टक्क्यांच्या वाढीसह सोन्याचा भाव आज 47,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास सोन्यामध्ये आणखी वाढ दिसून येईल, असे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत. दुसरीकडे, आज चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी कमी झाले आहेत. सध्या चांदीचे दर 61 हजार 668 रुपये प्रति किलो आहेत.
दरम्यान, सध्या कोरोनाचा धोका वाढत असताना आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यास मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. सध्या सोन्याचे भाव 48 हजारांच्या दरम्यान आहे. असे असले तरी आगामी काळात सोन्याचे दर 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
सन 2020 मध्ये, कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान, सोन्याचे भाव वेगाने वाढले होते. ऑगस्ट 2020 मध्ये तर सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असे सर्वाधिक पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर पुढील 2021 हे वर्ष मात्र सोन्यासाठी फारसे चांगले ठरले नाही. शेअर बाजारातील सततच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचे सोन्याकडे दुर्लक्ष झाले.