भारीच.. आता इंटरनेट नसले तरीही पैसे होतील ट्रान्सफर; RBI ने ऑफलाइन पेमेंटला दिलीय मंजुरी; जाणून घ्या काय आहे नियम
मुंबई : ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवायचे असतील तर त्यासाठी इंटरनेट पाहिजेच ना, इंटरनेट नसेल तर पैसे कसे पाठवणार असा प्रश्न असतो. बऱ्याचदा इंटरनेट नसल्याने पैसे पाठवता येत नाहीत. ग्रामीण भागात तर हा त्रास हमखास जाणवतो. मात्र, आता काळजी करण्याचे कारण नाही. आरबीआयने ऑफलाइन पेमेंटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता इंटरनेट नसले तरी सुद्धा तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.
आरबीआयने सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंट्स (Offline Digital Payments) बाबत एक रुपरेषा जारी केली आहे. ऑफलाइन पेमेंटअंतर्गत सध्या 200 रुपयांपर्यंत एक ट्रान्झॅक्शन करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त 10 ट्रान्झॅक्शन अर्थात एकूण 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांची मर्यादा असेल.
ऑफलाइन डिजिटल पेमेंट्सचा अर्थ असा की असे ट्रान्झॅक्शन ज्याकरता इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कची आवश्यकता असणार नाही. ऑफलाइन पद्धतीचे पेमेंट समोरासमोर कार्ड, वॉलेट आणि मोबाइलच्या मदतीने करता येऊ शकेल. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, या प्रकारच्या व्यवहारासाठी ‘अॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’ची आवश्यकता नाही. आरबीआयने असे म्हटले आहे की, यामध्ये पेमेंट ऑफलाइन होत असल्याने ग्राहकांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे मिळणारा अलर्ट थोड्या उशिराने मिळेल.
प्रत्येक व्यवहारासाठी 200 रुपयांची मर्यादा असेल. तर एकूण मर्यादा 2 हजार रुपये असणार आहे. ऑफलाइन पेमेंट प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत देशात काही ठिकाणी सुरू करण्यात आले होते. त्यानंतर याबाबत आराखडा तयार करण्यात आला.
ऑफलाइन पेमेंटमुळे खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल. ‘ ग्राहकाच्या परवानगीनंतरच ऑफलाइन पेमेंटचा वापर करता येईल, असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे.
आरबीआयने सांगितले, की पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या दोन्ही व्यक्ती समोरासमोर असाव्यात. कोणत्याही मशीनवर ऑफलाइन पेमेंट तेव्हाच होईल जेव्हा ग्राहक त्याला परवानगी देईल. यासाठी ग्राहक कार्ड, मोबाईल वॉलेट किंवा मोबाईल डिव्हाइसचा वापर करू शकतो. ऑफलाइन पेमेंटसंबंधी नवे नियम आणि सूचनांचं ऑथराइज्ड पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि पेमेंट सिस्टम पार्टीसिपेन्ट्स यांनी पालन करणं गरजेचे आहे.