मुंबई : नवीन वर्षात सोने खरेदीचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. कारण, आज नव्या वर्षाच्या पहिल्या सोमवारी सोने दरात काहीशी घसरण झाली आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे वायदे दर 0.19 टक्के कमी झाले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचा भाव 48 हजार 056 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. चांदीच्या दर सुद्धा 0.37 टक्क्यांनी कमी झाले आहेत. सध्या चांदीचे दर 62 हजार 430 रुपये प्रति किलो असे आहेत.
जाणकारांच्या अंदाजानुसार, जगभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्याचा परिणामवरही सोन्यावर पाहायला मिळेल. कोरोना साथ आणि महागाईच्या भीतीने 2022 मध्ये सोने 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकते असा अंदाज आहे. परंतु सध्या सोने खरेदीची चांगली संधी असल्याचं सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या कोरोनाचा धोका वाढत असताना आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यास मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. सध्या सोन्याचे भाव 48 हजारांच्या दरम्यान आहे. असे असले तरी आगामी काळात सोन्याचे दर 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
सन 2020 मध्ये, कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान, सोन्याचे भाव वेगाने वाढले होते. ऑगस्ट 2020 मध्ये तर सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असे सर्वाधिक पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर पुढील 2021 हे वर्ष मात्र सोन्यासाठी फारसे चांगले ठरले नाही. शेअर बाजारातील सततच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचे सोन्याकडे दुर्लक्ष झाले.