एअर इंडियाची मालकी टाटांकडेच; सरकारने केली आधिकृत घोषणा; पहा, किती कोटींचा आहे व्यवहार
नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडियाबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. तब्बल 68 वर्षांनंतर एअर इंडिया कंपनीची जबाबदारी टाटा समूहाकडे देण्यात आली आहे. या कंपनीसाठी पॅनलने टाटा समूहाची निवड केली आहे. एअर इंडियासाठी टाटा उद्योग समूह आणि स्पाइसजेटच्या अजय सिंह यांनी बोली लावली होती. टाटा समूहाने सर्वाधिक 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. सध्याच्या काळात या सरकारी कंपनीची अवस्था वाईट होती. आता टाटा समूहाने जबाबदारी स्वीकारली आहे, त्यामुळे कंपनीस पुन्हा चांगले दिवस येतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मोदी सरकारने जुलै 2017 मध्ये एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून कंपनी विकत घेण्याचे अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली कोणी लावली याबाबत डीआयपीएएम सचिव आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. त्यामुळे एअर इंडियाची मालकी आता टाटांकडे गेली आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 1953 साली भारत सरकारने टाटा सन्सकडून एअर इंडियाची मालकी खरेदी केली होती. त्यानंतर तब्बल 68 वर्षांनंतर पुन्हा कंपनीची जबाबदारी टाटा समूहास मिळाली आहे.
1953 मध्ये भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली. जेआरडी टाटा 1977 पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले. कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले.
दरम्यान, एअर इंडिया टाटा समूहाकडे जाणार या बातमीत तथ्य नसल्याचे म्हटले होते. परंतु, आज मात्र यावर शिक्कामोर्तब झाले. सरकारने याआधी 2018 मध्ये कंपनीतील 76 टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. त्यावेळी मात्र सरकारला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारने कंपनी पूर्णपणे विक्री करण्याचा निर्णय घेतला.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.