दिवाळीआधी नोकरदारांना मिळणार गिफ्ट; पीएफबाबत केंद्र सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशातील कोट्यावधी पीएफ खातेधारकांच्या फायद्याच्या दृष्टीने सरकार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. इपीएफओ सदस्यांना लवकरच पीएफवर व्याज मिळणार आहे. इपीएफओ दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफवरील व्याजाचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. देशभरात इपीएफओचे जवळपास साडेसहा कोटी सभासद आहेत. या सभासदांना व्याजाचे पैसे देण्याबाबत आधीही सांगण्यात आले होते. त्यानंतर आता ऐन दिवाळी सणात कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यात पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले, की सरकारकडून ज्यावेळी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता देण्यात येईल त्यावेळी इपीएफओ व्याजाची रक्कमही त्यांच्या खात्यात जमा करील. भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय मंडळाने 8.50 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. या व्याजदरासाठी इपीएफओने अर्थ मंत्रालयाची परवानगी मागितली आहे. मंत्रालयही या प्रस्तावास मंजुरी देईल असे सांगण्यात येत आहे. मंत्रालयाने जर मंजुरी दिली तर लगेच पुढील कार्यवाही करुन कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. त्यामुळे शक्यतो दिवाळीच्या आधीच हे पैसे जमा होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, आता देशात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. कोरोनाच्या दोन्ही लॉकडाऊनच्या काळात लाखो लोकांना आपले रोजगार गमवावे लागले. त्यामुळे देशातील बेरोजगारी दरात वाढ झाली आहे. आता कोरोना आटोक्यात आल्यानंतर लॉकडाऊनचे निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे आर्थिक घडामोडी पूर्वपदावर येत आहेत. सरकारनेही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमुळे देशात पुन्हा रोजगारात वाढ होताना दिसत आहे. इपीएफओकडे नव्या सभासद नोंदणीची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच, देशात रोजगाराचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.