म्हणून आगामी काळात स्मार्टफोनच्या किमती वाढण्याची शक्यता; पहा, कोणत्या कारणांमुळे बिघडणार गणित
मुंबई : जर सध्याच्या काळात तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण, आगामी काळात सणासुदीच्या दिवसात स्मार्टफोनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मोबाइल कंपन्या स्मार्टफोनच्या किमतीत 7 ते 10 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. काही कंपन्या कमी किमतीतील फोनही आणणार आहेत. मागील सहा महिन्यांपासून चीनमधून भारतात येणाऱ्या आवश्यक वस्तूंबाबत काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे फोनच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पीटीआय नुसार, सध्या जगभरात सेमी कंडक्टरला मागणी वाढली आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन कामकाज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉप सारख्या वस्तूंची मागणी वाढली आहे. सेमी कंडक्टरच्या वाढत्या मागणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. चीन मध्ये माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. भारतातील बहुतांश इलेक्ट्ऱ़ॉनिक वस्तूंचे स्पेअर पार्ट चीनमधून येतात.
काउंटरपॉइंट रिसर्च संस्थेचे निर्देशक तरुण पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन उद्योगावर पुरवठा साखळीच्या निर्बंधांचा प्रभाव आणखी दोन तिमाहीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या हंगामात याचा परिणाम अनेक प्रकारांनी जाणवणार आहे. तसेच, खरेदीदारांसाठी ऑफरही कमी असतील. असे असले तरी सणासुदीच्या काळात मागणी जास्तच राहण्याचा अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.
Realme कंपनीचे उपाध्यक्ष माधव सेठ यांनी सांगितले, की सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. मोबाइल कंपन्यांसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. 2022 मधील दुसऱ्या तिमाहीपर्यंत तरी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर यामध्ये सुधारणा होतील.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.