Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून शेतकऱ्याने ढोबळी वाटली फुकट; वाचा राहुरीची दुर्दैवी ‘बेकायदेशीर कृत्या’ची शेतीकथा

अहमदनगर : शेतीत बक्कल पैसे मिळत असल्याच्या अपवादात्मक बातम्यांना मुलामा लावून रंगवण्याच्या धोरणात शेतीचे वास्तव माध्यमातून गायब झालेले आहे. ढोबळी मिरची या नगदी पिकावर केलेला मोठा खर्च वासून होत नसल्याचे पाहून नैराश्य आलेल्या शेतकऱ्याने आपला कष्टाने पिकवलेला सोन्यासारखा माल चक्क फुकटात विकण्याचे ‘बेकायदेशीर कृत्य’ केले आहे.

Advertisement

बाजारात ढोबळी मिरचीला ३० रुपये किलोचा बाजारभाव सुरू असताना मात्र राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मोंढ्यावरील आडत्याकडुन १ रुपया किलो बाजारभावाने मागणी करण्यात आल्याने वैतागून शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर तालुक्यातील वावरथ जांभळी येथील शेतकरी श्रीकांत पाटील यांची ही बातमी आहे.

Advertisement

पाटील यांनी ५ एकर ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. शेतीची नांगरट, रानबांधणी, रोपे, मल्चिंग, रोगाची फाटेबांधणी, किडनाशक औषधाची फवारणी यासाठी एकरी ८० ते ९० हजार रुपये खर्च करून ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आहे. मात्र, राहुरी बाजार समितीच्या आडत्याशी संपर्क करून अडीच हजार रुपयात भाडोत्री टेम्पोमध्ये ढोबळी मिरचीच्या बॅगा भरून बुधवारी पहाटे आणल्या. मात्र, आवक जास्त असल्याचे कारण पुढे करत आडत्याने ढोबळीला फ़क़्त एक रुपया किलोचा बाजारभाव मिळेल असे म्हटल्यावर श्रीकांत पाटील यांना डोळ्यातील अश्रू लपवता तर आले नाहीतच उलट या नैराश्याने त्यांनी ही मिरची फुकट वाटली.

Advertisement

श्रीकांत पाटील यांनी मोठा खर्च करून टोमॅटो पिकाची लागवड केलेली आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील बाजारात हा टोमॅटो विक्रीसाठी आणला होता. २० किलो वजनाच्या टोमॅटो क्रेटला ८० रुपयांचा बाजारभाव मिळाला. २० किलोच्या वाहतुकीवर ५० रुपये खर्च झाल्याने एक किलो टोमॅटो विक्रीतून पाटील यांना अवघे दीड रूपये हातात पाडले. त्यामुळेही त्यांनी संताप व्यक्त एला आहे.

Advertisement
ढोबळी मिरचीचा खर्च (एक एकरसाठी)
ढोबळी मिरचीच्या १० हजार रोपांसाठी ३० ‌हजार रूपये
मल्चिंगसाठी १२ हजार रुपये
शेणखतासाठी १० हजार रुपये
रोपाचे फाटेबांधणी, किड नाशक फवारणी व मशागत यावर ३० हजार रुपये

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply