अहमदनगर : बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर सोयाबीन, मूग, उडीद, तूर पिकांसाठी लाभदायक आहे. पेरणी करणार्या शेतकर्यांनी आपल्या पेरणी यंत्रात बदल करून पेरणी केल्यास अतिपावसाच्या काळात पीक सुरक्षित राहू शकेल. बीबीएफ तंत्रामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होते शिवाय उत्पादनातही वाढ होते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पिकास मुबलक हवा व सूर्यप्रकाश मिळतो. पीक जोमदार होऊन कीड रोगास बळी पडत नाही. आंतरमशागत, सरीमधून ट्रॅक्टर, फवारणी यंत्राद्वारे कीटकनाशक फवारणी करता येते. जमिनीची धूप कमी होते. सेंद्रिय खताचा र्हास थांबल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते. उतारास आडवी पेरणी केल्याने मुलस्थानी जलसंधारण होते, असे अनेक बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे फायदे आहेत. बीबीएफ यंत्र व जुन्या पेरणी यंत्राचे बीबीएफमध्ये रूपांतर याबाबत माहिती देताना रमेश ताठे बोलत होते.
कृषी विभाग व नगरच्या एमआयडीसीतील श्रीनाथ अॅग्रो यांच्या वतीने बीबीएफ (रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करणार्या शेतकर्यांसाठी तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले व उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीबीएफ तंत्रज्ञानाचा पेरणीसाठी उद्देश व फायद्यांची विजय सोमवंशी यांनी माहिती दिली. श्री. ताठे पुढे म्हणाले की, निविष्ठा खर्चात बचत होऊन उत्पन्न 25 ते 30%पर्यंत वाढते. वरंब्यावर ओला टिकून राहिल्याने पर्जन्यमान खंडकालावधीत सुद्धा पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेणे शक्य होते. बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून रुंद सरी वरंबा काढणे व पारंपरिक पेरणी यंत्राद्वारे पेरणी करून पेरणीपश्चात मृत सरी काढणे. या दोन बीबीएफ (रुंद वरंबा सरी) लागवड तंत्रज्ञानाच्या पद्धती आहेत. क्रीडा हैदराबाद विकसित चारफणी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित पाचफणी ही दोन बीबीएफ तंत्रज्ञानासाठी उपलब्ध असलेले पेरणी यंत्र असल्याचे ते म्हणाले.
कार्यशाळेस उपस्थित जिरायत व बागायत भागातील शेतकर्यांनी तंत्रज्ञानाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याप्रसंगी कर्जुनेखारेचे कृषिमित्र राजू सय्यद, इसळकचे कृषिमित्र संतोष गेरंगे, जय मातादी कृषी गटाचे दत्तात्रय शेळके, विकास निमसे, रोहित शेळके, गोसावीबाबा कृषी गटाचे भाऊराव गायकवाड, राहुल गायकवाड, शिंगवेनाईकचे उत्तम जाधव, अनिल खाकाळ, नांदगावचे रामदास पुंड, सुंदर जाधव, उद्धव मोरे, पिंपळगाव माळवीचे सुनील गायकवाड, श्रावण रायकर, छबू लहारे आदी उपस्थित होते. विजय सोमवंशी म्हणाले की, कृषी विभागाच्या वतीने रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचे महत्व शेतकर्यांना पटवून दिले जात आहे. वाफसा, जमीन सुपिकता, मातीचा सुपीक थर टिकविण्यासह बियाणे वापरात सुमारे 40% बचत, तर उत्पादनात एकरी दीड क्विंटलपर्यंत वाढ मिळविणे त्यातून शक्य होते. हे यंत्र ट्रॅक्टरचलित आहे. पेरणीसाठी चार व पाच दाते आहेत. यंत्रात विविध बियाणे पेट्या (बॉक्स) आहेत. त्याद्वारे एकाचवेळी आंतरपीक पेरणी शक्य होते. यंत्राद्वारे 18 पिकांची पेरणी शक्य आहे. यामध्ये कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन तीळ आदींचा समावेश करता येईल. कमी खर्चात आंतरमशागत या यंत्रामुळे शक्य आहे, असे ते म्हणाले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक अभिजीत डुक्रे, यशवंत गाडेकर, सुविधा वाणी, वनिता मदने, नीना गिरी आदींनी परिश्रम घेतले.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.