MLC Election । आज राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पार पडत असून या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे विधानपरिषदेचे गुप्त पद्धतीने मतदान होईल. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळू शकते.
याच कारणामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटाने खबरदारी म्हणून आपपल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले आहे. या आमदारांना मतदान कसं करायचं? याबद्दलच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे 5 उमेदवार, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. तर शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटलांना पाठिंबा दिला आहे.
‘हे’ उमेदवार उतरले निवडणुकीच्या रिंगणात
भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत
शिवसेना (एकनाथ शिंदे ) : भावना गवळी, कृपाल तुमणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा राजीव सातव
शेतकरी कामगार पक्ष : जयंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : मिलिंद नार्वेकर