MLC Election 2024 । आज राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पार पडत असून या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत. यात काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेकापचे जयंत पाटील यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांनी खळबळजन दावा केला आहे. जयंत पाटील म्हणाले की, “या निवडणुकीत काँग्रेसचे असे तीन ते चार आमदार आहेत ते क्रॉस व्होटिंग करणार आहेत. कारण ते फक्त कागदोपत्रीच काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्यात मोजणार नाही.” जयंत पाटलांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली असून, यामध्ये कोणाला दगाफटका बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, “राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. आता येत्या काळात देखील राज्यातील महायुतीत भूकंप होईल,” असा मोठा दावा काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार महायुतीत पुन्हा एकदा भूकंप झाला तर राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या आगामी जागावाटपावर मी आज तर काही बोलू शकत नाही. पण उद्या महायुतीत मोठा भूकंप येईल. तुम्हाला माहिती आहे की, विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा एक उमेदवार पडणार आहे. त्यानंतर आपण बोलू की, कुणाला किती जागा मिळतील. आता कुणाला किती ताकद आहे ते लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली, असेही कैलास गोरंट्याल यांनी स्पष्ट केले.