MLA Disqualification । बिग ब्रेकिंग! ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार? शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात धाव

MLA Disqualification । राज्याचे राजकारण कोणते वळण घेईल? हे काही सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. अशातच आता ठाकरे गटाचे आमदार धोक्यात आले आहेत.

पुन्हा एकदा आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. शिंदे गटाने हायकोर्टाला तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे. उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंनी याचिका केली असून आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. यावर आता न्यायालयाने 6 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाने एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी जाहीर केला. यावेळी राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा दिला. पण ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही.

ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यामुळे भरत गोगावलेंनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून आमदारांचा कार्यकाल संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. पण ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप घेतला आहे.

Leave a Comment