Milk subsidy । राज्यात शेतीसोबत मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पन्न घेतले जाते. शेतीसोबत केलेल्या या जोडव्यवसायामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होतो. अशातच आता दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहेत. सरकारने दुधाला प्रती लीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले असून शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या पोर्टलवर जिल्ह्यातील शेवटच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची जबाबदारी दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे दिली आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या अनुदानातील अटी देखील शिथील केल्या आहेत. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात असल्याची माहिती दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. यामुळे दूध उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, दूध भुकटीचे उत्पादन वाढून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रती किलो ३० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. पशुखाद्याच्या दरांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले जात असून राज्यात ७० लक्ष मेट्रीक टन पशुखाद्याची निर्मिती होते. पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या यासंदर्भात बैठका घेतल्या आहेत.
हे लक्षात घ्या की, राज्यात गोशाळांच्या सनियंत्रणासाठी गो शाळा आयोगाची स्थापना केली आहे. गो शाळांमध्ये सांभाळ होणाऱ्या पशुंसाठी मदत करण्याच्या संदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जाणार आहे. दुधाला किमान हमी दर (एमएसपी) देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याला केंद्राकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.