Vikhe Patil News : दूध उत्पादकांना होणार फायदा, विखे पाटलांचा मोठा निर्णय

Vikhe Patil News : राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 जुलैपासून दुधाला तीस रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर त्यांना पाच रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे.

मात्र आतापर्यंत याचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री विखे पाटील यांनी हा लाभ दूध उत्पादकांपर्यंत पोहचण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करा असे आदेश दिले आहे.

याच बरोबर दूध अनुदानासाठीचा शेतकऱ्यांचा डेटा संकलन व अपलोड करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये तसेच जाचक अटी वगळण्यात याव्यात असेही निर्देशही त्यांनी दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत दिले. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सर्व खासगी तथा सहकारी दूध संघ आणि दूध उत्पादकांसोबत बैठक मंत्रालयात झाली.या बैठकीस आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे ,सुरेश धस , सदाभाऊ खोत, सत्यजित तांबे ,रवीशेठ पाटील, महेंद्र थोरवे,  अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, विविध दूध संघांचे प्रतिनिधी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यासह महसूल दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

दुग्धव्यवसाय विकास मंत्री विखे पाटील म्हणाले, शासन दूध  उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर असून दूध दर वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. दुधाला हमी भाव मिळावा यासाठी राज्य सरकार तर्फे केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

नुकतीच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची या संदर्भात भेट घेतली असून केंद्र सरकार सुद्धा सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

दूध दराच्या बाबत घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना  दिलासा देण्याबाबतच्या अनुषंगाने विधानसभा अधिवेशन सुरू असल्याने सभागृहात देखील माहिती देण्यात आली असून  शासनाने शेतकऱ्यांचे हित ध्यानात घेऊन केलेल्या निर्णयाची तातडीने  सहकारी दूध उत्पादक संघ आणि खाजगी दूध व्यवसायिक कंपन्यांनी कार्यवाही करावी असे मंत्री विखे पाटील म्हणाले. 

बैठकीत यावेळी दूध उत्पादकांना अनुदान वेळेत मिळण्यासाठी संगणकीय प्रणाली द्वारे माहिती एकत्रित करणे, दुधास हमीभावाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे, दूध प्रक्रिया उद्योगांच्या दुध पावडर निर्यातीच्या विषयाबाबत चर्चा करण्यात आली.  यावेळी विविध प्रतिनिधींनी आपले मते व्यक्त केले.

Leave a Comment