पुणे : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने Baleno ही प्रीमियम हॅचबॅक आणि XL6 प्रीमियम MPV कारचे CNG पर्याय लॉन्च केले आहेत. या दोन्ही Nexa च्या श्रेणीतील कार असून CNG तंत्रज्ञानानेही आता युक्त आहेत. मारुती सुझुकी बलेनो सीएनजीचे डेल्टा व्हेरिएंट 8.28 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह लॉन्च केले आले आहे. तर Zeta वेरिएंटची किंमत 9.21 लाख रुपयांपर्यंत आहे. याशिवाय XL6 ही एकाच Zeta प्रकारात असून तिची किंमत 12.24 लाख रुपये आहे. अर्थात या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
Maruti Suzuki च्या मते सीएनजीची लोकप्रियता आता सतत वाढत आहे आणि नेक्साचे खरेदीदार देखील कार्बन कमी उत्सर्जन असलेल्या आणि कमी किमतीच्या वाहनांना प्राधान्य देत आहेत. 2010 मध्ये मारूतीने CNG कार विकण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत त्यांनी तब्बल 11.400 लाख CNG कार विकल्या आहेत. यामुळे आर्थिक वर्ष 2022 पर्यंत 13.100 लाख टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन वाचले आहे. पर्यावरण संवर्धन आणि देशाच्या उन्नतीसाठी हा मोठा हातभार आहे. त्यामुळेच आता सीएनजी कारमध्ये हे दोन सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकांना सुसाट फिरायला जाणे परवडणार आहे.
मारुती सुझुकी कंपनी सध्या अल्टो, वॅगनआर, एर्टिगा, डिझायर या सीएनजी वाहनांची विक्री करते. Baleno आणि XL6 च्या जोडीने या ब्रँडकडे आता CNG ची एकूण 12 मॉडेल्स उपलब्ध आहेत. नव्या Baleno आणि XL6 दोन्हीमध्ये काही बदल केलेले आहेत. जसे की 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, अपडेटेड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि केबिनमध्ये नवीन 9-इंच डिजिटल टचस्क्रीन यांसारख्या नवीन वैशिष्ट्यांचा यात समावेश आहे. Baleno CNG आणि XL6 CNG कंपनीच्या सबस्क्रिप्शन प्रोग्रामवर उपलब्ध आहेत. प्रीमियम हॅचबॅकसाठी याची किंमत रु. 18,403 आणि प्रीमियम MPV साठी रुपये 30,821 या पासून सुरू होते. मारुती सुझुकी ग्राहकाच्या मासिक सदस्यता शुल्कामध्ये संपूर्ण नोंदणी, सेवा आणि देखभाल, विमा आणि रस्त्याच्या कडेला मदतीचा खर्च समाविष्ट असतो.
मारुती बलेनो सीएनजी ही 1.2 लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह येते आणि त्याच्या सीएनजी सेटअपमध्ये 30.61 किलोमीटर प्रतिकिलो अव्हरेज अर्थात मायलेज देण्याचा दावा आहे. तसेच पॉवरट्रेन CNG मोडमध्ये 75.9bhp आणि पेट्रोल मोडमध्ये 88.5bhp पॉवर जनरेट होते. त्याचप्रमाणे CNG मोडमध्ये टॉर्क 98.5Nm आणि पेट्रोल मोडमध्ये 113Nm आहे. मारुती XL6 ही CNG 1.5 लीटर K-सिरीज पेट्रोल मोटरसह असून ज्याचे मायलेज 26.32 किमी/किलो आहे. MPV CNG मोडमध्ये 86.6bhp आणि पेट्रोल मोडमध्ये 99.23bhp निर्मिती करते.