Maratha Reservation । राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. आरक्षणावरून राज्य सरकारची कोंडी होत आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
“जर परत शरद पवार यांचं सरकार येईल तेव्हा परत आरक्षण गायब होईल. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर परत एकदा भाजपला सत्ता द्या,” असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. पुणे दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी संविधान बदलण्याचा प्रचार केला होता. त्याला आम्ही उत्तर दिलं.आता राज्यात काही महिन्यांच्या अंतराने विधानसभा निवडणूक होत आहेत. त्यामुळे शरद पवार हे वेगवेगळं भ्रम तयार करताना आपल्याला दिसत आहेत. मराठा आरक्षणावरुन शरद पवार जे भ्रम तयार करत आहेत, त्याला अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उत्तर देत असून मराठा समाजाला आरक्षण भाजप तेव्हाच मिळेल ज्यावेळी राज्यात भाजपचं सरकार येतं, असं शहा म्हणालेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोधकांनी आपली भूमिका मांडावी असं देखील आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना शरद पवारांनी सत्ताधारी लोकांनी भुमिका घेतली पाहिजे, विरोधकांच्या भुमिकेशी काय अर्थ नसतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.
“राज्यात २०१४ मध्ये भाजपचं सरकार होतं. त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी मराठा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं. नंतर शरद पवार यांचे सरकार आलं तेव्हा मराठा आरक्षण गायब झालं,” अशी खोचक टीका अमित शहा यांनी केली आहे.