Maratha Reservation । मोठी बातमी! लक्ष्मण हाके यांच्या निर्णयामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या

Maratha Reservation । आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच पेटत चालले आहे. ओबीसी, धनगर आणि मराठा आरक्षणामुळे राज्य सरकारची सर्व बाजूने कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.

अशातच सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसरकट ओबीसीतून आरक्षण द्यावी, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. आज हा अल्टिमेटम संपत आहे. आजच मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅली काढणार असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

असे असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला कडक शब्दात इशारा दिला आहे. “सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास मुंबई जाम करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्यातल्या १२ कोटी समाजाचे नेतृत्व करीत आहात.आम्ही ६० टक्के ओबीसीने तुम्हाला मते दिली आहेत. तुम्ही सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नका,” अशी विनंती हाके यांनी केली आहे.

पुढे लक्ष्मण हाके म्हणाले, “बीड येथील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर उभे राहून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. त्याचा देखील आम्ही निषेध करतो. आमच्या अठरा पगड जातीचे आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या भुजबळ साहेबांवर कोणी अशा प्रकारची शिवराळ भाषा वापरून टीका करत असेल, तर आम्ही महाराष्ट्रातील सगळी माणसे एकत्रित येऊन त्याचा निषेध करू,” असेही हाके यांनी स्पष्ट केले.

“मनोज जरांगे पाटील यांना २८८ जागा लढवायच्या असतील तर त्यांनी लढवून पाहाव्यात. महाराष्ट्राची सुसंस्कृत ओळख पुसायचे काम करणारे अनेक हिटलर होऊन गेले. पण इथली जनता सुज्ञ आहे,” अशा शब्दात हाके यांनी जरागेंवर हल्ला चढवला. त्यामुळे आता एकाबाजूला मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचा इशारा यामुळे राज्य सरकार पुढील अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment