Maratha reservation । मागील काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्याचे वातावरण चांगलेच पेटले आहे. मराठा,ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्य सरकारची चांगलीच कोंडी होत आहे.
राज्यात मागील वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पेटला असून सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा दावा केला आहे की, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजेच EWS मधून अर्ज करता येणार नाही, असे नोटीफिकेशन लोकसेवा आयोगाने काढले आहे. जर गुणरत्न सदावर्ते यांचा हा दावा खरा ठरला तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसेल.
राज्यात मराठा समाज राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि EWS लाभ घेत असून एकाच समाजाला तीन आरक्षणांचा लाभ कसा घेतो? असा प्रश्न सदावर्तेंंनी न्यायालयात उपस्थित केला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यांचा युक्तीवाद मान्य करत नवीन रीट याचिका दाखल करण्यास परवानगी दिली होती.
मागील वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आरक्षणाचा लढा सुरू असून जरांगे पाटील यांनी पुन्हा २० जुलैपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
“सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केला आहे. याला एक तर बदनाम करा, नाहीतर घातपात करा. सरकार मला काय घातपात करेल. मला जो मारायला येणार आहे, त्याने फक्त मी जागी असल्यावर यावं, एका बुक्कीत दात पाडेल. २० तारखेलाच मुंबईत कधी जायचं, याची तारीख ठरवणार. मराठ्यांच्या मतावर आमदार होऊन मराठ्यांच्याच घराच्या समोर डीजे लावून नाचत त्रास द्यायचा नाही. तुम्ही आनंद घ्या जल्लोष करा. ज्या आमदारांनी त्यांना मतदान केले, त्यांनी त्या आमदारांना सांगावे,” असेही जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.