Manoj Jarange Patil । जरांगे पाटलांनी सांगितली पुढची योजना, म्हणाले; “१३ जुलैपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर…”

Manoj Jarange Patil । राज्यात दिवसेंदिवस आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणावरून पेटून उठला आहे. त्यामुळे राज्य सरकारची दोन्ही बाजूने कोंडी होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे देखील आक्रमक झाले आहेत.

जरांगे पाटील यांची सध्या शांतता रॅली सुरु आहे. या दरम्यान, त्यांनी मोठा इशारा दिला आहे. “येत्या १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं असल्याने कुणीही गाफील राहू नका. जर राज्य सरकारने आपल्याला १३ जुलैपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. सरकारने आरक्षण दिलं नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ,” असा गंभीर इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आपण इतकी वर्षे आपल्या नेत्यांना मोठे करत आलो आहोत. आता आपल्या मुलांना कसं मोठं करता येईल ते पाहुयात. अनेकांनी आपल्या मुलांना मरताना पाहिलं असून आरक्षण नसल्यामुळे खचलेलं पाहिलं आहे. पण आपल्याला आता आपली लेकरं मोठी करायची आहेत त्यासाठी आपल्याला आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण थांबायचं नाही,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment