Manoj Jarange Patil । मागील काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्याचे वातावरण चांगलेच पेटले आहे. मराठा,ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्य सरकारची चांगलीच कोंडी होत आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. पण अचानक मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेत आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. मला रात्री हात पाय धरुन सलाईन लावली. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे असे मत होते की, आम्हाला तुम्ही आणि आरक्षण दोन्हीही पाहिजे.
पण मला जर असंच सलाईन लावत असतील, तर दुपारी उपोषण स्थगित करु. कारण सलाईन लावली तर उपोषणाला आता अर्थ नाही. त्यामुळे गावातील ज्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला, त्यांच्या हस्ते आपण उपोषण सोडणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली आहे.
मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारला पुन्हा वेळ देतो. 13 ऑगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य घ्याव्यात. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती ओढण्यासाठी आता मला तयारी करायची असल्याने मी सलाईन लावून उपोषण करणार नाही. सलाईन न लावता उपोषण करू दिले तरच उपोषण सुरू ठेवणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.