Manohar Joshi । राजकीय वर्तुळात शोककळा! शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन

Manohar Joshi । राजकीय वर्तुळावर मोठी शोककळा पसरली आहे. कारण शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले.

कुटुंबप्रमुखाप्रमाणेच त्यांना नेहमीच मार्गदर्शन मिळाले : नितीन गडकरी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा हरपला आहे.अत्यंत विनम्र, तडफदार आणि महाराष्ट्राविषयी तसेच मराठी माणसांबद्दल तळमळ असणारा नेता आपण गमावला आहे. आघाडी सरकारच्या काळात मला जोशी सरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती.”

ओम बिर्ला यांनीही व्यक्त केला शोक

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर अशी प्रतिक्रिया दिली आहे की, “माजी लोकसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी श्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो. लोकशाही मूल्ये समृद्ध करत त्यांनी उत्कृष्ट संसदीय परंपरा प्रस्थापित केल्या. सभागृह चालवण्याच्या त्यांच्या अनोख्या आणि न्याय्य शैलीमुळे त्यांना सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये आदर होता.”

बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय

माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते बाळासाहेबांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते, त्यामुळे मागील वर्षी त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी आणि इतर कुटुंबीयांसह रुग्णालयात जाऊन त्यांची प्रकृती विचारत होते.

जोशी हे 1995 ते 1999 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अविभाजित शिवसेनेचे राज्याचे मुख्यमंत्री बनणारे ते पहिले नेते होते. 2002 ते 2004 या काळात केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये ते खासदार आणि लोकसभेचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.

Leave a Comment