Manipur Violence Update: मागच्या काही दिवसांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे .
मणिपूरमध्ये सध्या परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की सरकारने हिंसाचार करणाऱ्यांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले.
तर दुसरीकडे सीआरपीएफने मणिपूरमधील आपल्या कर्मचार्यांना आणि त्यांच्या मूळ राज्यात रजेवर गेलेल्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह जवळच्या सुरक्षा तळावर “तात्काळ” तक्रार करण्याचे निर्देश दिले. मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने आपल्या एका कोब्रा कमांडोच्या हत्येनंतर हे पाऊल उचलले आहे. सीआरपीएफचा एक कोब्रा कमांडो रजेवर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चुराचंदपूर, मणिपूर येथे सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली.
मणिपूर हिंसाचाराच्या आगीत का जळत आहे?
हा हिंसाचार 3 मे रोजी सुरू झाला होता. या दिवशी मणिपूरच्या आदिवासी विद्यार्थी संघटनेने मोर्चा काढला होता. मणिपूरमधील मेईतेई समाजाचा आदिवासी जमातीत म्हणजेच एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीविरोधात हा मोर्चा होता.
हा मोर्चा मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात झाला, ज्यामध्ये हजारो आदिवासी आंदोलक सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार सुरू झाला आणि नंतर हा हिंसाचार वाढतच गेला.
9 हजार लोकांना घरे सोडावी लागली
राजधानी इम्फाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीची हृदयद्रावक चित्रे समोर येऊ लागली आहेत. अनेक ठिकाणी घरे जाळण्यात आली. वाहने जाळण्यात आली. हिंसाचाराचा अवलंब करणाऱ्या जमावाने ठिकठिकाणी तोडफोड केली.
परिस्थिती इतकी वाईट झाली की मणिपूर सरकारने 3 मेच्या रात्री केंद्राकडे मदत मागितली, त्यानंतर मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागात लष्कर आणि सशस्त्र दल तैनात करण्यात आले. हिंसाचारानंतर आतापर्यंत 9 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र या हिंसाचारात किती लोकांना जीव गमवावा लागला आहे आणि किती लोक जखमी झाले आहेत, हे सांगण्याच्या स्थितीत राज्य सरकार अद्यापही नाही.