Election Commission: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला जाहीर करण्यात आलेली मतदानाची टक्केवारी आणि अंतिम आकडेवारीमध्ये मोठा फरक असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
यावर आता निवडणुकीची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न असल्याची मोहीम राबविली जात आहे. असं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
काँग्रेसने शनिवारी ‘व्होट फॉर डेमोक्रसी‘च्या अहवालाचा हवाला देत लोकसभा मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याबद्दल निर्माण झालेल्या प्रश्न संदर्भात निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागितलं होतं.
आंध्र प्रदेश आणि ओडिशा संबंधित प्रश्न
अहवालानुसार, आंध्र प्रदेश आणि ओडिशा सारख्या काही राज्यांमध्ये, सुरुवातीला घोषित केलेली मतदार टक्केवारी आणि अंतिम आकडेवारी यांच्यात विलक्षण मोठे अंतर आहे. “काही लोक (उमेदवारांव्यतिरिक्त) मानवजातीच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निवडणुकीची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी खोटी मोहीम चालवत आहेत,” असं आयोगाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
निवडणूक आयोग काय म्हणाला?
आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीची तुलना करण्याचा बिनबुडाचा प्रयत्न करण्यात आला, जेव्हा अनेक मतदान केंद्रांवर मतदान संपले होते, तर काही मतदान केंद्रांवर मतदार अजूनही रांगेत उभे होते.
या स्थितीत मतदानाच्या एक दिवसानंतरच खरी टक्केवारी कळणार आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, निवडणूक डेटा आणि निकाल हे कायद्यातील वैधानिक स्वरूप आणि प्रक्रियांनुसार आहेत.
आयोगाच्या म्हणण्यानुसार, कोणताही उमेदवार किंवा मतदार याचिकेद्वारे निवडणूक निकालाला आव्हान देऊ शकतो परंतु या आधारावर कोणतीही याचिका दाखल करण्यात आलेली नाही. निकाल जाहीर झाल्यापासून 45 दिवसांच्या आत निवडणूक याचिका (EP) दाखल करता येते.